बापरे! नागपुरात १६६ दिवसात २० हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:31 AM2020-08-24T11:31:14+5:302020-08-24T11:33:12+5:30
नागपूर जिल्ह्यात १६६ दिवसात कोरोना संक्रमितांच्या आकड्याने २० हजाराचा आकडा पार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात १६६ दिवसात कोरोना संक्रमितांच्या आकड्याने २० हजाराचा आकडा पार केला आहे. रविवारी संक्रमितांची संख्या २०,४३९ झाली. आतापर्यंत ७३० मृत्यू झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात २३ दिवसात सातत्याने कोरोनाचे आकडे वाढतच आहेत. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात एकूण १५,०४७ संक्रमित आढळले, यातील ६०४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. पण नागपुरात रिकव्हरी रेट सुधारत आहे. एकूण संक्रमितांपैकी ११,०५३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रिकव्हरी रेट ५४.०७ टक्के झाला आहे. आठवडाभरापूर्वी हा रेट ४४ टक्क्यांवर आला होता. नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता.
मार्च महिन्यात १६ संक्रमित होते. ५ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूची संख्या वाढतच गेली.
३१ जुलैपर्यंत नागपुरात ५,३९२ संक्रमित होते व १२६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. यात ३,४७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचे संक्रमण व मृतांची आकडेवारी वेगाने वाढली. २० ऑगस्टनंतर रविवार २३ ऑगस्ट रोजी पुन्हा ४६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील ४२, ग्रामीणचे २ व जिल्ह्याबाहेरील २ आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात ८२४ पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यात शहरातील ७१४ व ग्रामीणचे १०८ व जिल्ह्याबाहेरील २ आहेत. रविवारी ८१४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ११,०५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी ४०१ अॅन्टिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. २९१ खासगी लॅबमधून, नीरीच्या लॅबमधून ४५, मेयोतून ८६, एम्सच्या लॅबमधून १ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गेल्या २४ तासात ५,१३९ नमुने तपासण्यात आले.
१२ दिवसात मिळाले १० हजार नवीन रुग्ण
जिल्ह्यात ११ ऑगस्ट रोजी संक्रमिताचा आकडा १०,३६१ होता. ३७२ मृत्यू झाले होते. अवघ्या १२ दिवसात १० हजार नवीन पॉझिटिव्ह वाढले. विशेष म्हणजे पहिल्या १० हजाराचा आकडा गाठायला १५४ दिवस लागले होते.