अबब! बुटात आढळला साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 09:37 AM2018-10-05T09:37:55+5:302018-10-05T09:39:16+5:30
सकाळची वेळ.. आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याला बस पकडण्याची घाई... शेवटी बूट घालण्यासाठी तो घराच्या दाराजवळ आला. बुटाकडे नजर टाकताच त्याला शेपटी दिसल्याने बुटात साप असल्याचा संशय आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सकाळची वेळ.. आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याला बस पकडण्याची घाई... शेवटी बूट घालण्यासाठी तो घराच्या दाराजवळ आला. बुटाकडे नजर टाकताच त्याला शेपटी दिसल्याने बुटात साप असल्याचा संशय आला. हा प्रकार त्याने वडिलांना सांगितला आणि काही वेळाने दडलेला साप बुटातून बाहेर आला. हा प्रकार नागपूर तालुक्यातील खापरखेडा येथील प्रकाशनगर कॉलनीत नुकताच घडला.
सुमित सुधीर धार्मिक हा नागपूर येथील शासकीय आयटीआयमध्ये शिकत असून, प्रकाशनगर कॉलनीत तिसऱ्या माळ्यावर आई-वडिलांसोबत राहतो. सोमवारी सकाळी आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याने आवराआवर केली आणि बूट घालण्यासाठी दाराजवळ गेला. त्याचवेळी त्याला बुटात शेपटी दिसली. त्याने न घाबरता बूट हळूच फरशीवर ठेवला व वडिलांना माहिती दिली. वडिलांना विश्वास बसला नाही. त्यांनी गंमत म्हणून बूटकडे निरखून बघितले.
काही वेळातच साप बुटाबाहेर आला. शिवाय, शेजाºयांनी साप पाहण्यासाठी गर्दी केली होती. सर्पमित्र दद्दू गणवीर यांनी लगेच सुमितचे घर गाठले आणि सापाला पकडून दूरवर सोडले. तो कवड्या जातीचा असून, बिनविषारी असल्याची माहिती गणवीर यांनी दिली.