माझे जीवनच गाणे झाले; शास्त्रीय गायिका कल्याणी देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:09 AM2018-01-23T11:09:09+5:302018-01-23T11:09:33+5:30
राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘राज्य शासनाचा पुरस्कार हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच आहे. मात्र आजपर्यंत केलेल्या संगीतसाधनेचे सार्थक झाल्यासारखे वाटते. नागपूरचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. मनोहर नरहर बर्वे यांची मुलगी असल्याने बालपणीच गाण्याशी जुळले. काका पद््माकर बर्वे यांचाही प्रभाव होताच. त्यामुळे गाणं ऐकले, गाणं शिकले व गाणं जगले. आज आयुष्यच सुखद गाणं झाले, असे वाटते’ नागपूरच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांनी व्यक्त केलेले हे मनोगत अगदी त्यांच्या गाण्याप्रमाणेच स्वच्छ व निखळ आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले. शास्त्रीय संगीत किंवा गायन हे चित्रपटातील गाण्यासारखे नसते, त्यामुळे त्वरित लोकप्रिय होईल, ही शक्यताही नसते. अंतर्मनातून आलेले हे गाणे लोकप्रिय होण्याच्या अपेक्षेपेक्षा अंतर्मनातील सुखावण्यासाठी अधिक असते. अनेक वर्षांची साधना, तपस्या आणि समर्पण यामध्ये असते. याच कठोर साधनेतून डॉ. कल्याणी देशमुख या नावाची ओळख निर्माण झाली आहे.
डॉ. देशमुख यांना शास्त्रीय संगीताची खास आवड, मात्र उपशास्त्रीय संगीतातही त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. गाण्याकडे माझी ओढ पाहून वडिलांनीही ‘तू फक्त गाणच गा’ असा सल्ला दिला. वडिलांकडूनच त्यांनी उत्तर भारतीय शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यांच्या तालमीत तावून सुलाखून निघालेल्या डॉ. कल्याणी यांनी आपली ओळख निर्माण केली. ठुमरी, दादरा, भजन आणि अभंग गायनात त्यांची ओळख आहे. मात्र मराठी नाट्य संगीत हेही त्यांचे खास वैशिष्ट्य. त्यांची स्वरांची जादू ग्वाल्हेर घराण्याचे खयाली गायकी, किराणा आणि पतियाळा घराण्याची आलापी त्यांच्या अभिजात गायनात दिसून येते. त्यांनी सांगितले, शास्त्रीय संगीतात नियमांचे काटेकार पालन करावे लागते. मात्र उपशास्त्रीय गायनात नियम थोडे सैल होतात. त्यात सौंदर्य, भावाभिव्यक्ती अधिक असते. रागांच्या स्वरांचे साधर्म्य साधत सूर, ताल, लय आणि शब्द यांचा डौल सांभाळून सौंदर्याची अनुभूती लोकांपर्यंत पोहोचविणे त्यात महत्त्वाचे असते. आकाशवाणीच्या प्रथम श्रेणी सादरकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. वडिलांकडून मिळालेली संगीताची देणगी आयुष्यभर जपण्याची प्रयत्न केल्याची भावना डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.
मानसशास्त्रातील आचार्य पदवी प्राप्त डॉ. कल्याणी देशमुख यांना सहाव्या महाराष्टÑ राज्य नाट्य महोत्सवात सन्मानित करण्यात आले. १९८४ साली सूर सिंगर संसद, मुंबईतर्फे सूरमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. राज्य शासनाच्या पुरस्काराने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.