माझी मेट्रोच्या प्रवाशांमध्ये होतेय वाढ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:23+5:302020-12-22T04:08:23+5:30
नागपूर : माझी मेट्रोचे प्रवासी वाढत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू झालेल्या मेट्रो रेल्वे सेवेंतर्गत रविवारी २० डिसेंबरला सर्वाधिक ...
नागपूर : माझी मेट्रोचे प्रवासी वाढत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू झालेल्या मेट्रो रेल्वे सेवेंतर्गत रविवारी २० डिसेंबरला सर्वाधिक १७ हजार ५६२ प्रवाशांनी माझी मेट्रोने प्रवास केला. प्रत्येक रविवारी प्रवाशांची संख्या वाढत आहे. शनिवारी आणि रविवार सोडून इतर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सरासरी १० हजार पेक्षा अधिक आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात प्रवाशांची होत असलेली वाढ ही जयपूर, नोएडा आणि अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने मेट्रो रेल्वे सेवा ठप्प होती. अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच मेट्रो रेल्वेस्थानकांच्या कामाने गती घेतली. विविध मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी अनलॉक होऊन आता प्रवाशांना देवा देत आहेत. याचा लाभ नागपूरकरांना होत आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेगाड्यात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २० डिसेंबरला ऑरेंज आणि अॅक्वा लाईनवर धावलेल्या माझी मेट्रोतून १७ हजार ५६२ प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांना आपली किंवा महामेट्रोच्या फिडर सर्व्हिस अंतर्गत उपलब्ध सायकल मेट्रोने नेण्याची सुविधा पसंत येत आहे. तर शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, अधिकारी, समाजसेवक नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी मेट्रोने शहरातील आणि स्टेशन परिसरातील प्रतिष्ठीत नागरिकांना मेट्रो स्टेशन अॅम्बेसिडर म्हणून जोडले आहे.
............
कोरोनापुर्वी रविवारी प्रवासी संख्या
तारीख प्रवासी
२६ जानेवारी २०२० २१२५८
२ फेब्रुवारी २०२० १७७४९
९ फेब्रुवारी २०२० १७९६८
१६ फेब्रुवारी २०२० १६५७९
२३ फेब्रुवारी २०२० १३७२६
कोरोनानंतर रविवारी प्रवासी संख्या
तारीख प्रवासी
२० डिसेंबर २०२० १७५६२
१३ डिसेंबर २०२० १५४०४
६ डिसेंबर २०२० १३१८७
२९ नोव्हेंबर २०२० ११४८८
..........