माझी मेट्रोच्या वेळापत्रकात गडबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:09 AM2021-01-03T04:09:04+5:302021-01-03T04:09:04+5:30
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बराच काळ ठप्प झालेल्या ‘माझी मेट्रो’ची प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे; परंतु माझी ...
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बराच काळ ठप्प झालेल्या ‘माझी मेट्रो’ची प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे; परंतु माझी मेट्रोच्या वेळापत्रकात गडबड होत आहे. मेट्रो रेल्वेच्या रेल्वेगाड्या मेट्रो स्टेशनवर कधी वेळेच्या आधी येत आहेत तर कधी ठरविलेल्या वेळेपेक्षा उशिराने येत आहेत. हा उशीर फार अधिक नसला तरी सध्या ही परिस्थिती असून पुढे काय होईल, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.
प्रवाशांकडून मिळत असलेल्या तक्रारीच्या आधारे ‘लोकमत’ने मेट्रो रेल्वेच्या वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू आहे की नाही याची पडताळणी केली. यावेळी माझी मेट्रो ठरविलेल्या वेळेच्या पूर्वी आणि नंतर मेट्रो स्थानकावर आली. त्यानंतर ‘लोकमत’चे प्रतिनिधी उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनिअर्स येथील मेट्रो स्थानकावर गेले. येथून अॅक्वा लाईनच्या सुभाषनगर मेट्रो स्टेशनपर्यंत तिकीट घेतले. या दरम्यान दुपारी २.४४ वाजता प्लॅटफार्मवर रेल्वेच्या आगमनाची वेळ दाखविणाऱ्या बोर्डावर लोकमान्यनगरकडे जाणारी मेट्रो रेल्वे तीन मिनिटांत येणार असल्याची माहिती देण्यात येत होती. त्यानुसार रेल्वे २.४७ यायला हवी होती; परंतु प्रत्यक्षात रेल्वेगाडी २.४९ वाजता आली. या पद्धतीने मेट्रो रेल्वे २ मिनिटे उशिराने प्लॅटफार्मवर पोहोचली. येथून ‘लोकमत’ प्रतिनिधी सुभाषनगर मेट्रो स्टेशनवर पोहोचले. आता परतीच्या रेल्वेगाडीची वाट पाहताना दुपारी ३.०१ वाजता प्लॅटफार्मवर असलेल्या बोर्डात सीताबर्डीकडे जाणारी मेट्रो रेल्वे १० मिनिटांत म्हणजे दुपारी ३.११ वाजता येणार असल्याची माहिती देण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात ही गाडी दोन मिनिटे पूर्वी म्हणजे दुपारी ३.०९ वाजता प्लॅटफार्मवर येताना दिसली. यामुळे प्रवाशांनी वेळापत्रकांत गडबड होत असल्याच्या केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले.
.........
वेळेनुसार धावावी माझी मेट्रो
मेट्रोच्या वेळापत्रकाची चाचपणी करताना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स आणि सुभाषनगर मेट्रो स्टेशनवर भेटलेल्या काही प्रवाशांनी माझी मेट्रो वेळापत्रकानुसार धावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या दोन ते तीन मिनिटांचा फरक पडत असला तरी भविष्यात मेट्रो रेल्वे लवकर आणि उशिराने येण्याची वेळ वाढू शकते. त्यामुळे याकडे महा मेट्रो प्रशासनाने लक्ष देऊन प्रवाशांच्या वेळेची किंमत ओळखण्याची मागणी प्रवाशांनी केली.
..............