माझ्या आईचाही कर्करोगामुळे मृत्यू झाला; त्यामुळे वेदनांची पूर्ण जाण आहे- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:30 PM2023-04-27T15:30:55+5:302023-04-27T15:39:21+5:30
२५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात ४७० खाटांची सुविधा असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवांनी सुसज्ज अशी ही कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे.
नागपूर येथील जामठा येथे उभारण्यात आलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या वतीने या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे.
२५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात ४७० खाटांची सुविधा असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवांनी सुसज्ज अशी ही कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. या कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राज्यातील नागपूर, विदर्भासह मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठीही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून हे इन्स्टिट्यूट तयार झाले आहे. सध्या परवडणाऱ्या किंमतीत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, हवामान बदल, जीवनशैलीतील बदल यामुळे कर्करुग्ण वाढत असून ही एक मोठी समस्या बनली आहे. देवेंद्रजींचे वडील आणि माझ्या आईचा मृत्यू कर्करोगामुळे झालेला असल्याने त्या वेदनांची आम्हाला पूर्ण जाण आहे. त्यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी या इन्स्टिट्यूटचा नक्कीच लाभ होईल, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
#नागपूर येथील जामठा येथे उभारण्यात आलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट चा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 27, 2023
डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या वतीने या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे. २५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात ४७० खाटांची सुविधा… pic.twitter.com/Z8zfe7q7CQ
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसारख्या संस्थेच्या उभारणीचे स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. तसेच अशा अनेक आरोग्य मंदिरांची राज्याला गरज आहे. या आरोग्य मंदिराला राज्यातील लोकप्रतिनिधी भेट देतील आणि इथला सेवाभाव पाहून प्रभावित होऊन आपापल्या भागात अशी आरोग्य मंदिरे उभारतील अशी अपेक्षा एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली. येथील डॉक्टर, नर्सेस देवदूताप्रमाणे कार्य करतील असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण समारंभातून लाईव्ह https://t.co/y6LLFmzYqA
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 27, 2023