विद्यार्थ्यांपर्यंत प्रयोग पोहचविणारी ‘माय सायन्स लॅब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:33 AM2018-06-20T11:33:10+5:302018-06-20T11:33:19+5:30
शहरामध्ये अनेक शाळांमध्ये विज्ञान विषय सोपा करून शिकविण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तर ही परिस्थिती विदारक आहे. लहानपणी शिकताना हेच अपूर्णत्व अनुभवलेल्या तीन तरुणांच्या संकल्पनेतून ‘माय सायन्स लॅब’ उभी राहिली आहे.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विज्ञान हा खरं तर अत्यंत सोपी आणि विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागृत करणारा विषय आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि करिअरच्या दृष्टीनेही या विषयाचे महत्त्व आहे. मात्र आपल्या देशातील शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसाठी हा विषय कठीण आणि कंटाळवाणा होतो. याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शाळांमध्ये प्रयोगशाळांचा अभाव. शहरामध्ये अनेक शाळांमध्ये विज्ञान विषय सोपा करून शिकविण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तर ही परिस्थिती विदारक आहे. लहानपणी शिकताना हेच अपूर्णत्व अनुभवलेल्या तीन तरुणांच्या संकल्पनेतून ‘माय सायन्स लॅब’ उभी राहिली आहे. वंचित विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानाचे प्रयोग पोहचविण्याचा हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होय.
धनंजय बालपांडे, मंगेश लेपसे व अविनाश गायकवाड, अशी या तीन तरुणांची नावे. यातील मंगेश हे जर्मनी व अविनाश हे कतारमध्ये एका कंपनीत नोकरीवर आहेत तर धनंजय हे नागपूरला स्वत:चा व्यवसाय सांभाळून या प्रयोगशाळेची जबाबदारी सांभाळत आहेत. आजही अनेक शाळांमध्ये विज्ञानाच्या प्रयोगशाळा नाहीत, उपकरणांची वानवा आहे. विज्ञान हा महत्त्वाचा विषय पुस्तकातून वाचणे आणि पाठांतर करून परीक्षेत लिहिणे, हेच अभ्यासाचे स्वरूप आहे. आश्चर्य नको की या तिघांनीही हीच परिस्थिती त्यांच्या शाळांमध्ये अनुभवली आहे. आज हे तिघेही त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत. त्यांना विज्ञानाची आवड आहे. त्यांनी अनुभवलेली कमतरता इतर मुलांच्या वाट्याला येऊ नये, ही सामाजिक जाणीव लक्षात घेऊन त्यांनी ‘माय सायन्स लॅब’ची निर्मिती केली आहे.
पाथ फार्इंडर संस्थेच्या माध्यमातून नागपुरातून या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवत नंदनवन येथील महिला महाविद्यालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता तिसरीपासून दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील बहुतेक सर्व प्रयोगांचे सुसज्जित मॉडेल विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध केले आहेत. विद्युत निर्मिती, न्यूटनचे नियम, सौर ऊर्जा, ओहमचा नियम, प्रकाशाचे परावर्तन, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, मानवी शरीर रचना, चुंबकाचे प्रयोग, डीएनए मॉडेल असे सर्व प्रकारचे २५० च्यावर विज्ञान मॉडेल या लॅबमध्ये आहेत. ज्या शाळांकडे प्रयोगशाळा नाही अशा शाळेतील विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात ही लॅब उपलब्ध करून दिली जात आहे. एक तर त्या शाळांची मुले या लॅबमध्ये प्रयोग करण्यासाठी येऊ शकतात किंवा लॅबमधील आवश्यक असलेले मॉडेल शाळेत नेले जाऊ शकते.
मागील वर्षी ही अभिनव प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून या शैक्षणिक सत्रात ६३ शाळांमधून १२००० विद्यार्थ्यांपर्यंत प्रयोग पोहचविण्यात आल्याचे धनंजय बालपांडे यांनी सांगितले. यात शहर आणि ग्रामीण भागातील शाळांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळांमध्ये अभ्यासासाठी आणि विज्ञान प्रदर्शनासाठीही या लॅबमधून उपकरणे नेली जात आहेत. शिवाय ५००० च्यावर विद्यार्थ्यांनी माय सायन्स लॅबमध्ये भेट देऊन प्रयोग करण्याचा आनंद घेतल्याचे बालपांडे यांनी सांगितले.
केवळ प्रयोगांची नाही तर विज्ञानाच्या तज्ज्ञ शिक्षकांद्वारे मार्गदर्शनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहजरीत्या विज्ञान शिकायचे असेल तर छोट्या प्रयोगशाळांची गरज आहे. माय सायन्स लॅबने ही गरज पूर्ण करण्याची नवी दिशा निर्माण केली आहे.
लॅब आॅन व्हील अॅन्ड बाईक
विविध शाळांची गरज लक्षात घेऊन पाथ फार्इंडरच्या टीमने लॅबची व्यापक सेवा अंगिकारली आहे. ‘लॅब आॅन व्हील’ आणि ‘लॅब आॅन बाईक’ असे दोन नवे उपक्रम आहेत. लॅब आॅन व्हीलअंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंत कुठल्याही वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक प्रयोगांचे ६० च्या जवळपास मॉडेल कारमध्ये आवश्यकता असलेल्या शाळांपर्यंत पोहचविले जातात. ज्या शाळांची आवश्यकता कमी आहे त्यांच्यासाठी मोटरसायकलवर ३० मॉडेल पोहचविले जातात. विद्यार्थी दिवसभर या प्रयोगांद्वारे विज्ञान शिकू शकतात. या उपक्रमाला शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रा. अजय गिºहे व छाया पोटघरे यांनी सांगितले. शाळांना मदत करू पाहणाऱ्या सामाजिक संस्था व व्यावसायिकांनी सहकार्य केल्यास ग्रामीण भागातील शाळांपर्यंत ही धावती प्रयोगशाळा पोहचविण्याचा मानस बालपांडे यांनी व्यक्त केला.