रहस्यमय आग : नागपूरच्या अजनी वाहतूक कार्यालयातील ३२ गाड्या जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 09:08 PM2020-04-03T21:08:11+5:302020-04-03T21:10:19+5:30
अजनी वाहतूक कार्यालय परिसरात ठेवलेल्या ३२ गाड्या आगीमध्ये जळून खाक झाल्या. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी वाहतूक कार्यालय परिसरात ठेवलेल्या ३२ गाड्या आगीमध्ये जळून खाक झाल्या. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली. अजनी परिसरात सकाळी लोकमतचे विक्रेते वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचवीत होते. तेव्हा वाहतूक कार्यालयापुढे त्यांना वाहने जळताना दिसली. विक्रेत्याने पोलीस कंट्रोल रूम व अग्निशमन विभागाला सूचना दिली. त्यानंतर नरेंद्रनगर फायर स्टेशनचे अधिकारी धरमपाल नाकाडे यांच्या नेतृत्वात दोन गाड्या कार्यालयात पोहचल्या. या आगीत ३० दुचाकी वाहने व २ ऑटो जळाले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. अजनी वाहतूक विभागाच्या कार्यालय परिसरात शेकडो जप्त केलेले वाहने आहेत. वाहतूक कर्मचारी आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावत आहेत.