‘जय’ च्या ‘रेडिओ कॉलर’ चे गूढ वाढले!
By admin | Published: September 10, 2016 02:11 AM2016-09-10T02:11:06+5:302016-09-10T02:11:06+5:30
मागील चार महिन्यापूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या ‘जय’ चा अद्याप सुगावा लागला नसला,
चार महिने उलटले : शोधमोहिम थंडावली
नागपूर : मागील चार महिन्यापूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या ‘जय’ चा अद्याप सुगावा लागला नसला, तरी त्याच्या गळ्यातील बंद पडलेल्या ‘रेडिओ कॉलर’ चे गूढ मात्र निश्चितच वाढले आहे. त्याचवेळी ‘जय’ च्या प्रकरणाची सीआयडी व सीबीआयच्या माध्यमातून चौकशी सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र यासंबंधी वन मुख्यालयाला अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.
‘जय’ च्या गळ्यातील ‘रेडिओ कॉलर’ ने गत १९ एप्रिलपासून सिग्नल देणे बंद केले असल्याचे स्वत: वन विभागाने मान्य केले आहे. मात्र त्याचवेळी ‘जय’ हा ब्रह्मपुरी आणि नागभीडच्याही पुढे सुमारे ५८० चौ. किलो मीटरच्या परिसरात भटकंती करीत होता, असाही वन विभागाने दावा केला आहे. यातच १९ एप्रिल रोजी ‘जय’ ची रेडिओ कॉलर बंद पडली आणि त्याचा वन विभागाशी संपर्क तुटला.
अधिकाऱ्यांन्ांी केले दुर्लक्ष
नागपूर : मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने तब्बल अडीच महिन्यांपर्यंत ती माहिती दडपून ठेवली. वास्तविक ‘जय’ ची रेडिओ कॉलर बंद पडली, त्याच दिवसापासून तो गायब झाला आहे. याची पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाणीव असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर जुलै महिन्यात संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला आणि वन विभागाची झोप उडाली. वर्तमानपत्रात बातम्या झळकताच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालायने पेेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयास ताबडतोब ‘जय’ चा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने पाच शोध पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने रवाना केले.
या सर्व पथकांनी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या सभोवताल असलेल्या भंडारा, ब्रह्मपुरी, नागभीड व वडसा परिसरातील जंगल पिंजून काढले. मात्र तरी ‘जय’ चा कुठेही शोध लागला नाही. यामुळे वन विभागाने गडचिरोलीपर्यंत धाव घेऊन शोधाशोध केली, परंतु तरी ‘जय’ सापडला नाही. त्यामुळे वन विभागाची शोधमोहिम ही केवळ औपचारिकता सुरू असल्याचा वन्यजीव क्षेत्रातून सूर व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, सध्या व्याघ्र राजधानीचा सर्वत्र गवगवा होत आहे. अशा स्थितीत राज्याचा वन विभाग एका वाघाचा शोध घेण्यात अपयशी ठरत आहे. मात्र असे असताना वन मंत्रालय गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)