नाग नदीसह पिवळी व पोराही उजळणार : स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:15 PM2019-05-02T23:15:49+5:302019-05-02T23:16:48+5:30
महापालिका शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छता अभियान ५ मे ते ५ जूनदरम्यान राबविणार आहे. शहराचे वैभव असलेल्या नाग नदीची अवस्था चांगली नाही. पिवळी व पोहरा नदीचीही अशीच अवस्था आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील नद्या स्वच्छ असणे गरजेचे आहे. त्याशिवाय शहर स्मार्ट होणार नाही. महापालिका प्रशासन स्वच्छता मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. परंतु प्रशासनालाही मर्यादा असल्याने नागरिकांसह शासकीय-निमशासकीय, खासगी व सेवाभावी संस्थांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. सर्वांचा सहभाग असल्याशिवाय हे अभियान यशस्वी होणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिका शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छता अभियान ५ मे ते ५ जूनदरम्यान राबविणार आहे. शहराचे वैभव असलेल्या नाग नदीची अवस्था चांगली नाही. पिवळी व पोहरा नदीचीही अशीच अवस्था आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील नद्या स्वच्छ असणे गरजेचे आहे. त्याशिवाय शहर स्मार्ट होणार नाही. महापालिका प्रशासन स्वच्छता मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. परंतु प्रशासनालाही मर्यादा असल्याने नागरिकांसह शासकीय-निमशासकीय, खासगी व सेवाभावी संस्थांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. सर्वांचा सहभाग असल्याशिवाय हे अभियान यशस्वी होणार नाही.
दरवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे नद्यांचा प्रवाह बंद होत असल्यामुळे, पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नद्यांची सफाई करण्यात येणार असून, पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही, त्यादृष्टीने नद्यांमधील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
‘लोकमत’ने सर्वप्रथम नाग नदी स्वच्छता मोहिमेसाठी नागपूरकरांना हाक दिली होती. नदीकाठावरील वस्त्यांमध्ये जनजागरण मोहीम राबविली होती. त्यानंतर तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वात वर्ष २०१३ मध्ये अंबाझरी ते पारडीपर्यंत नागपूरकरांनी मानवी साखळी करीत लोकसहभागदेखील नोंदविला होता. त्यानंतर दरवर्षीच्या अभियानादरम्यान लोकमततर्फे जनजागृती अभियान राबविले जाते. यंदाही ही मोहीम राबविली जाणार आहे.
२०१३ मध्ये अभियानाला सुरुवात
शहरातील नद्यांची स्वच्छता व्हावी, यासाठी तत्कालीन महापौर आमदार प्रा. अनिल सोले यांच्या पुढाकाराने २०१३ साली नाग नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. २०१३ मध्ये सुमारे महिनाभर घरोघरी जाऊन जनजागृती अभियान राबविले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या नाग नदीत दूषित पाणी सोडले जाते. कचरा टाकला जातो. यामुळे नदीपात्रात गाळ व कचरा मोठ्या प्रमाणात साचतो.
गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी दूषित
नाग नदीला पिवळी नदी मिळते व पुढे या नदीचे पाणी गोसेखुर्द धरणात जाते. यामुळे धरणाचे पाणी प्रदूषित झाले आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता, भविष्यात गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागणार आहे. याचा विचार करता नाग नदीद्वारे वाहून नागपूर शहरातील दूषित पाणी गोसेखुर्द प्रकल्पात जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. काही प्रमाणात का होईना स्वच्छता अभियानामुळे याला आळा बसण्याला मदत होणार आहे.
गाळ व मातीची विल्हेवाट लावण्याची गरज
नदीतून निघणारा गाळ, माती व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. नदीतून काढण्यात आलेला गाळ व माती काठावर साचून राहिल्यास पुराच्या वेळी गाळ व माती पुन्हा नदीपात्रात येते. गेल्या वर्षी काही प्रमाणात गाळ व माती भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात आली होती. तसेच शहरातील खोलगट वा पावसात पाणी साचणाऱ्या भागात गाळ व माती टाकण्यात आली होती. नदीतून निघणारा गाळ व माती तिथेच साचू न देता लगेच त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.
नाग नदी
नागपूर शहराच्या मध्य भागातून वाहणाºया नाग नदीची स्वच्छता वर्ष २०१३ दरवर्षीच्या उन्हाळ्यात केली जाते. दरवर्षी नदीपात्रातील गाळ व कचरा मोठ्या प्रमाणात काढला जातो. परंतु नदीत पुन्हा कचरा व गाळ साचतो. या नदीच्या किनाºयावर ३६ झोपडपट्ट्या आहेत. नदीपात्र स्वच्छ केले नाही तर पावसाळ्याच्या दिवसात झोपडपट्टीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. ५ मे रोजी नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ होत आहे. १८ कि.मी. लांबीच्या नाग नदीचे पात्र नेहमीप्रमाणे विविध टप्प्यात विभाजित करून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
पोरा नदी
दक्षिण पश्चिम व दक्षिण नागपूरसह नव्या नागपुरातून वाहणाऱ्या १२ कि.मी. लांबीच्या पोरा नदी स्वच्छता अभियानाचा प्रारंभही ५ मे रोजी होत आहे. मागील काही वर्षांपासून दरवर्षी या नदीतील गाळ काढला जातो. परंतु पावसाळ्याच्या दिवसात नरसाळा-पिपळा परिसरातील पुलाजवळ नदी तुंबते. पावसाळ्यात आजूबाजूच्या वस्त्यांत व शाळा-महाविद्यालयाच्या आवारात पाणी साचते. पुलाजवळील नदी व पिपळा नाल्याच्या संगमाजवळील गाळ काढून पात्र मोठे केले तर पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या उद्भवणार नाही.