सहा महिन्यांत नॅक मूल्यांकन करा, नाही तर अनुदान बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 08:32 PM2022-11-04T20:32:12+5:302022-11-04T20:32:43+5:30
Nagpur News ज्या महाविद्यालयांनी अद्याप नॅक मूल्यांकन केलेले नाही. त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
नागपूर : राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता व स्तर वाढविण्याच्या हेतूने उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करणे अनिवार्य केले आहे. ज्या महाविद्यालयांनी अद्याप नॅक मूल्यांकन केलेले नाही. त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मूल्यांकन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर विविध स्वरुपाच्या कारवाया करण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला २०२४ प्रॉस्पेक्टिव आराखड्यानुसार एकूण ५८४ महाविद्यालये संलग्न आहेत. यातील फक्त १३० महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले आहे. विद्यापीठाला २०२४ पर्यंत ४१७ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात २९१ महाविद्यालये
नागपूर जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला एकूण २९१ महाविद्यालये संलग्न आहेत. यात नागपूर शहरातील १७१ तर ग्रामीणमधील १२० महाविद्यालयांचा समावेश आहे.
उच्च शिक्षण संचालकांचे निर्देश
राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालय अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मूल्यांकन न केल्यास संलग्न राहणार नाही
महाविद्यालयांनी सहा महिन्यात नॅक मूल्यांकन न केल्यास विद्यापीठ संलग्नता दिली जाणार नाही. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)यांच्याकडून अनुदान मिळणार नाही. पाठ्यक्रम, प्रवेश क्षमता व नवीन विषयांना मंजुरी मिळणे अवघड जाईल.