एनएडीटी नागपुरातच हवे

By admin | Published: September 12, 2015 02:50 AM2015-09-12T02:50:38+5:302015-09-12T02:50:38+5:30

ही बाब गांभीर्याने घेऊन एनएडीटीला अतिरिक्त जमीन देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी केले.

NADT is required only in Nagpur | एनएडीटी नागपुरातच हवे

एनएडीटी नागपुरातच हवे

Next


मान्यवरांची एकमुखी मागणी : शासनाने उपाय काढावा

नागपूर : उपराजधानीत राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख कायम ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संस्थानच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. या गरजा पूर्ण केल्या तर ही संस्था इतर शहरात हलविण्याची आवश्यकताच नाही. केवळ जमीन उपलब्ध नाही, असे म्हणून होणार नाही. हा विषय शासनाने गांभीर्याने घ्यायला हवा. लोकमतमध्ये शुक्रवारी ‘तर एनएडीटी दुसऱ्या शहरात जाणार’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर शहरातील आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया देऊन ही संस्था हलविण्यास विरोध केला आहे.
शहरासाठी हा झटका
एनएडीटी नागपुरातून हलविण्यात आली तर शहरासाठी हा मोठा झटका ठरेल. या संस्थानामुळे अप्रत्यक्षपणे या शहराला लाभ होतो. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा लाभ शहरातील लहान उद्योजकांना होतो. त्यामुळे ही संस्था स्थानांतरित होऊ देणार नाही.
स्वप्नील अग्रवाल, आयसीएआय, नागपूर शाखा

सर्वांसाठीच लाभदायी
एनएडीटी येथे असणे लाभदायी आहे. संस्थानचा इतिहास पाहिला तर या संस्थानचा किती लाभ या शहराला झाला आहे, याची माहिती मिळेल. युवावर्ग एनएडीटी पाहतो तेव्हा त्यालाही काही करण्याची प्रेरणा मिळते. ही संस्था या शहरातून हलविली तर शहराचे मोठे नुकसान होईल.
संदीप जोतवानी, सचिव, आयसीएआय, नागपूर शाखा

शहराच्या विकासाला बाधा येईल
राज्य शासन शहराच्या विकासासाठी अनेक घोषणा करीत आहे. मागील काही वर्षात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या येथे आल्या आहेत. आयआयएम देखील येथे सुरू करण्यात आले. एम्स सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. नागपूर शहर भविष्यात आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात देशाचे केंद्र होण्याचे हे संकेत आहेत. अशावेळी येथून एनएडीटी हलविण्यात आली तर शहराच्या विकासात बाधा निर्माण होईल.
डॉ. भरत मेघे, माजी अधिष्ठाता, वाणिज्य शाखा, रातुम नागपूर विद्यापीठ

सरकारने निश्चित पुढाकार घ्यावा
राज्य शासनाने यासंदर्भात निश्चित उपाययोजना केली पाहिजे. या संस्थानची गरज किती योग्य आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. या संस्थानला जमिनीची गरज का आहे, हे समजून घेतल्याशिवाय उपाय निघणार नाही. शासनाला ही मागणी योग्य वाटत असेल तर ती पूर्ण केली गेली पाहिजे. राज्य शासन असमर्थ असेल तर केंद्र शासनाची मदत घ्यावी. एनएडीटीला येथून जाण्याची गरज पडू नये हाच प्रयत्न होणे योग्य आहे.
नितीन चोपडे, असोसिएट प्रोफेसर, धनवटे नॅशनल कॉलेज

उपाय काढले जातील
एनएडीटीने यासंदर्भात माझ्याशी संपर्क केलेला नाही. पण संस्थानला मनोरु ग्णालयाची जमीन हवी असल्याची माहिती आहे. ही मागणी पूर्ण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. तशीही मनोरुग्णालयाची जमीन सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रीडा संकुल, फायर कॉलेज यांना देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्याकडे जमीन उपलब्ध नाही. एनएडीटी या शहरातून स्थानांतरित होऊ नये, ही माझीही इच्छा आहे. यावर उपाययोजना केली जाईल.
सुधाकर देशमुख, आमदार

फडणवीस-गडकरी यांनी प्रयत्न करावेत : खा. दर्डा
एनएडीटीचे आमच्या देशाच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत विशेष स्थान आहे. येथून प्रशिक्षण घेऊन निघणारे अधिकारी देशाच्या समृद्धी आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. येथून प्रशिक्षित अधिकारी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात आयकर विभागात महत्त्वपूर्ण पदांवर जातात. त्यामुळेच हे संस्थान संपूर्ण देशाला नागपूरशी जोडते. त्यामुळे हे संस्थान शहरासाठी एखाद्या महत्त्वाच्या अलंकारासारखेच आहे. केवळ जमीन उपलब्ध नसल्याने एनएडीटी येथून जाणार असेल तर हे शहराचे गंभीर नुकसान करणारे आहे. अधिकाधिक संस्थांना नागपुरात आणण्याचे प्रयत्न चालू असताना शहरातील एक प्रतिष्ठित संस्थान जागेअभावी हलवावे लागत असेल शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे चांगले संकेत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन एनएडीटीला अतिरिक्त जमीन देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी केले.

Web Title: NADT is required only in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.