आठ वर्षांत पूर्ण होईल नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:42+5:302021-07-03T04:06:42+5:30

नागपूर : राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाच्या वित्त समितीची मान्यता मिळाल्यानंतर नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प आठ वर्षांत पूर्ण केला ...

The Nag River Pollution Eradication Project will be completed in eight years | आठ वर्षांत पूर्ण होईल नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प

आठ वर्षांत पूर्ण होईल नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प

Next

नागपूर : राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाच्या वित्त समितीची मान्यता मिळाल्यानंतर नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प आठ वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाद्वारे अंमलात आणला जाणार आहे. प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संचालनालयाच्या वित्त समितीने हिरवी झेंडी दाखवल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्टची नियुक्ती केली जाईल व पुढे प्रकल्प मान्यतेची अधिसूचना जारी होईल. हा २ हजार ११७ कोटी ५६ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प असून, जपानीज इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने या प्रकल्पाकरिता १ हजार ८६३ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास सहमती दर्शवली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार १ हजार ३३७ कोटी ९३ लाख (६० टक्के), राज्य सरकार ४८७ कोटी २७ लाख (२५ टक्के) तर, महानगरपालिका २९२ कोटी ३६ लाख (१५ टक्के) रुपये देणार आहे. मनपाने २०२१ मध्ये या प्रकल्पाकरिता २ कोटी रुपयाची तरतूद केली आहे. या प्रकल्पानंतर नाग नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हातात घेतला जाईल, अशी माहिती मनपाने न्यायालयाला दिली.

-----------------

यांच्यामुळे गोसेखुर्द धरण प्रदूषित

गोसेखुर्द धरण केवळ नागपूर व नाग नदीमुळे नाही, तर कन्हान व वैनगंगा नदी आणि या नद्यांवरील गावांमुळेही प्रदूषित होत आहे, असा दावा मनपाने केला. नागपुरातून वाहणाऱ्या नाग नदी व पिली नदी या पुनापूर येथे एकत्र होऊन पुढे कन्हान नदीला मिळतात. कन्हान नदी वैनगंगा नदीत मिसळते. गाेसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणात या सर्व नद्यांमधील सांडपाणी गोळा होते. नाग नदीच्या काठावर नागपूरसह पोवारी, धारगाव, आसोली, महालगाव, सावली, गारला, पळसाद, निंभा, शिवनी, भामरेवाडा, झाल, विरंभा, चानोरा, नवेगाव, चापेगाडी व बोरगाव, कन्हान नदीच्या काठावर राजोला, कन्हेरी, लोहारा, पेवठा, चिचोली, आवरमारा व पिपरी, तर वैनगंगा नदीच्या काठावर तिड्डी, पवनी, आंबोरा, मंडी, जामगाव, वडद, हाटगाव, सावरगाव, बाळापूर, सानदल, खापरी, तामसवाडी, पानरी, पेंढारी, मालनी, जीवनपूर, कुक्कड ढुमरी व गोसेखुर्द ही गावे वसली आहेत. ही सर्व गावे पाणी प्रदूषणाकरिता कारणीभूत आहेत, असे मनपाने स्पष्ट केले.

---------

नाग व पिली नदीवर एसटीपी

नाग नदीवर व्हीएनआयटी परिसरात १२ एमएलडी, मोर भवन परिसरात ३५ एमएलडी व मोक्षधाम येथे ५ एमएलडी, तर पिली नदीवर नारा येथे ४५ एमएलडी व मानकापूर येथे ५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प (एसटीपी) उभारला जाणार आहे. या नद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी या प्रकल्पांकडे वळवून शुद्ध केले जाईल व त्यानंतर नद्यांमध्ये सोडले जाईल. मनपाद्वारे २०१२ पासून या दोन्ही नद्यांची दरवर्षी स्वच्छता व खोलीकरण केले जाते; परंतु, नागरिक कचरा फेकत असल्यामुळे स्वच्छता फार काळ टिकून राहत नाही, असे मनपाने सांगितले.

-------------------

राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय प्रतिवादी

नाग नदी प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवनाकरिता उच्च न्यायालयाने २०२० मध्ये स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यात मनपाने सदर प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाने ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती देण्यासाठी या प्रकरणात राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाला प्रतिवादी करून घेतले. तसेच संचालनालयाला नोटीस बजावून यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ॲड. निखिल पाध्ये यांनी न्यायालय मित्र म्हणून, तर मनपाच्या वतीने ॲड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.

Web Title: The Nag River Pollution Eradication Project will be completed in eight years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.