नागनदी प्रकल्पाला लवकरच सुरुवात : जिका आणि डीईएमध्ये मार्चमध्ये ऋणकरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 09:07 PM2020-02-27T21:07:31+5:302020-02-27T21:08:44+5:30
नागपूर शहरातील महत्त्वपूर्ण ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन’ प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासंबंधी आवश्यक कार्यवाहीला गती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील महत्त्वपूर्ण ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन’ प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासंबंधी आवश्यक कार्यवाहीला गती मिळाली आहे. नागनदी प्रकल्पासाठी आवश्यक खर्चासंदर्भात जपानची वित्तीय संस्था जिका (जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) व डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स (डीईए) यांच्यात येत्या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात महत्त्वपूर्ण ऋणकरार केला जाणार आहे.
यासंबंधी नुकतीच दिल्ली येथे डीईएचे संचालक अविनाश कुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय, पर्यावरण विभाग, जिकाचे भारत व जपानच्या प्रतिनिधींसह मनपातर्फे कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी व मनपाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इस्राइल उपस्थित होते.
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महापौर संदीप जोशी यांच्याद्वारे प्रकल्पासाठी पाठपुरावा केला जात आहे. २४१२.६४ कोटींचा हा प्रकल्प आहे. यात केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महापालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून ६० टक्के म्हणजे १४४७.५९ कोटी, राज्य शासनाकडून २५ टक्के म्हणजे ६०६.१६ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे ३६१.८९ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन जपानची वित्तीय संस्था जिका यांच्याकडून १८६४.३ कोटी रुपये ०.९५ टक्के व्याजदराने ३० वर्षाकरिता अर्थसाहाय्य घेणार आहे.
मनपा या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. प्रकल्पांतर्गत नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे होणार आहेत. नागपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्पासाठीच्या ऋणकरारामुळे प्रकल्पाच्या कार्याला लवकरच सुरुवात होण्याचे चिन्ह आहेत. प्रकल्पामुळे नागनदीचा चेहरामोहरा बदलणार आहे.