मेट्रो रेल्वेमुळे होणार नागपूरकरांची दमछाक
By admin | Published: December 31, 2015 03:19 AM2015-12-31T03:19:54+5:302015-12-31T03:19:54+5:30
वाचून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य अहे. मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यास आतूर असलेल्या नागपूरकरांची मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे दमछाक होणार आहे.
वर्धा मार्गावरील वाहतूक वळविणार : बांधकाम सुरू
आनंद शर्मा नागपूर
वाचून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य अहे. मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यास आतूर असलेल्या नागपूरकरांची मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे दमछाक होणार आहे. बांधकामाचा प्रारंभ नवीन वर्षात होणार असून काम वेगाने होण्यासाठी जनतेला त्रास सहन करावा लागेल.
कोणताही महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार करताना अस्थायीरीत्या वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होतो. असे प्रकल्प जनतेच्या सहकार्याविना साकार होत नाहीत. मेट्रो रेल्वेच्या संदर्भातही काहीशी अशीच बाब आहे. मेट्रोत प्रवास करायचा असेल तर जनतेला वाहतूक व्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा सामना करावा लागेल.
सध्या मेट्रो रेल्वेचा मिहान डेपो ते वर्धा रोडवरील हॉटेल प्राईडपर्यंतचे बांधकाम वेगात सुरू आहे. वर्धा मार्ग वगळता उर्वरित मार्गावर जास्त वाहतूक जास्त नसल्यामुळे बांधकाम सहजरीत्या होत आहे. पण प्राईड हॉटेलजवळ रस्त्याच्या मध्यभागी पिल्लर उभे करण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. पायलिंग मशीनमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूचा जवळपास ९ मीटरचा परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता रुंद झाला आहे. सध्या या मार्गावर वाहतूक जाम होण्याची स्थिती नाही.
पहिल्या टप्प्याचे बांधकाम वर्धा रोडवर रहाटे कॉलनी चौकापर्यंत होणार आहे. या मार्गावर वाहनांची ये-जा जास्त असते. अशा स्थितीत काम पूर्णत्वास नेण्यासाठी वाहतूक वळविणे आवश्यक आहे. त्यामुळे नागपूरकरांना त्रास होईल.
जनतेचे सहकार्य हवे : गिरी
मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वाहतूक सेलचे प्रमुख अरविंद गिरी म्हणाले. आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना त्रास होणार आहे. वाहतूक विभागाच्या परवानगीने वर्धा मार्गावर बांधकामासाठी एकूण ९ मीटर जागा ताब्यात घेतली आहे. यासाठी वाहतूक सल्लागार जयंत उके यांनी वर्धा मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ट्राफिक व्हॉल्यूम काऊंट आणि पॅसेंजर कार युनिटसंदर्भात (पीसीयू) सर्वेक्षण केले आहे. सध्या वर्धा मार्गावर वाहतूक जाम होण्याची स्थिती नाही. आवश्यकता भासल्यास रहाटे कॉलनी चौकापर्यंत मेट्रोचे काम करताना वाहतूक वळविण्यात येईल. यासाठी योग्य वेळी आवश्यक पावले उचलण्यात येतील.