नागपुरात मेट्रो रेल्वेचे ‘जॉय राईड’ मार्चमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:32 AM2018-01-31T00:32:53+5:302018-01-31T00:35:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वेचे ‘जॉय राईड’ अर्थात व्यावसायिक रन मार्चमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.
खापरी मेट्रो स्टेशन आणि डबलडेकर पुलाच्या पाहणी दौऱ्यानंतर दीक्षित यांनी सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
दीक्षित म्हणाले, कमिश्नर आॅफ मेट्रो रेल्वे सेफ्टीच्या चमूने नागपूर मेट्रो रेल्वेचे अॅटग्रेड सेक्शन आणि मिहान डेपोची पाहणी केली. चमूने अहवाल रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे. ही चमू दुसऱ्यांदा नागपुरात येणार असून सिग्नल, ट्रॅक आणि अन्य संबंधित पैलूंची तपासणी करणार आहे. हिरवी झेंडी मिळाल्यानंतर मार्चमध्ये जॉय राईड सुरू होईल. याकरिता प्रवासभाडे महाराष्ट्र सरकारतर्फे जानेवारी २०१४ मध्ये जारी केलेल्या संबंधित जीआरनुसार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार आहे.
रिच-१ चे बांधकाम नोव्हेंबरपर्यंत
खापरी ते सीताबर्डीपर्यंत ‘रिच-१’चे बांधकाम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. खापरी मेट्रो स्टेशनचे बांधकाम व्हिक्टोरिया प्रकारात करण्यात येत आहे. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा आणि दिव्यांग व वयस्कांसाठी विशेष सुविधा राहील.
दीक्षित म्हणाले, वर्धा रोडवर बांधण्यात येणाऱ्या डबलडेकर पुलाच्या डिझाईनमुळे २० टक्के आर्थिक बचत झाली आहे. हा पूल मनीषनगरच्या आरओबीला जोडला जाईल. याकरिता रिब अॅण्ड स्पाईन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचे संचालन सोलर ऊर्जेवर करण्यासाठी ‘रेस्को’ मॉडेलवर संबंधित कंपनी गुंतवणूक करून सोलर उपकरण लावून त्याचे संचालन करणाार आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडियाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार महामेट्रो प्रति युनिट सोलर एनर्जीचे भुगतान संबंधित कंपनी करणार आहे.
क्रेझी कॅसलची जमीन मेट्रो रेल्वेची
दीक्षित म्हणाले, मेट्रो स्टेशनच्या बांधकामाच्या दृष्टीने अंबाझरी येथील खासगी जमिनीचा प्रश्न निकाली निघाला आहे. आता क्रेझी कॅसलची जमीन महामेट्रोची होईल आणि क्रेझी कॅसलही राहील. महामेट्रोने विविध कार्यांसाठी प्रस्ताव दिले आहेत.
पत्रपरिषदेत वित्तीय संचालक एस. शिवमाथन आणि महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.