नागपंचमी विशेष; पोवळे, मृदुकाय, अंडेखाऊ साप विदर्भातून लुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:27 AM2019-08-05T10:27:11+5:302019-08-05T10:29:23+5:30
वाढते शहरीकरण, सापांबद्दल असलेले गैरसमज आणि सुरक्षिततेपोटी एकेकाळी विदर्भात विपुल प्रमाणात आढळणारे साप आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वाढते शहरीकरण, सापांबद्दल असलेले गैरसमज आणि सुरक्षिततेपोटी एकेकाळी विदर्भात विपुल प्रमाणात आढळणारे साप आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पोवळे, मृदुकाय आणि भारतीय अंडेखाऊ साप या सापांच्या तीन प्रजाती प्रामुख्याने विदर्भातून लुप्त होत चालल्या आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही साप बिनविषारी आहेत.
विदर्भातील वनसंपदेमुळे वन्यजीवांची संख्या अधिक आहे. मात्र शेतशिवार आणि जंगलामध्ये वाढलेला माणसांचा वावर, बदलत चाललेले ऋतूमान यामुळे अनेक जाती आता कमी होण्याच्या मार्गावर आहेत. भारतील अंडेखाऊ साप सर्वप्रथम विदर्भातच आढळल्याची नोंद आहे. हा साप प्रामुख्याने झाडावरील घरट्यांमधील पक्ष्यांची अंडी गिळतो. याचे वास्तव्यही झाडावरच अधिक प्रमाणात असते. मृदुकाय साप कोमल असून त्याची लांबी दीड फुटापर्यंत असते. पोवळे या सापाचे वास्तव्य जुनी घरे, भूसभुशीत जमिनीमध्ये असते. या सोबतच अनेक विनविषारी सापही वाढत्या नागरीकरणामध्ये घटत आहेत.
विदर्भामध्ये मुख्यत्वे नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे विषारी साप मोठ्या प्रमाणावर आढळतात. आग्या मण्यार भंडारा, गडचिरोली, पवनी, ब्रह्मपुरी, या धान पट्ट्यात प्रामुख्याने आढळतो. त्याच्या शरीरावर पिवळे-काळे पट्टे असतात तर, साधा मण्यारच्या निळसर काळ्या चकाकणाऱ्या शरीरावर आडवे पांढरे पट्टे असतात. घोणसवर शंकरपाळ्याच्या आकारचे ठिपके रांगेत असतात. डिवचल्यावर तो कुकरसारखी लांब शिट्टी मारतो. नागांमध्ये डोम्या आणि गव्हाळ्या असे दोन प्रकार आढळतात.
डोम्यावर काळे शेड्स असतात, गव्हाळ्या गहूवर्णीय असतो. एकमेव नागाच्या डोक्यावर रोमन अक्षरातील दहाचा आकडा असतो तर काहींच्या डोक्यावर नसतो सुद्धा. फुरसे विदर्भात सर्वत्र आढळत नसला तरी गोंदिया, भंडारा जिल्ह्यात आढळत असल्याची नोंद आहे. त्याचे वास्तव्य दगड, विटांच्या ढिगाºयाखाली असते. साधारणत: दीड फूट लांबीच्या या सापाच्या त्रिकोनी डोक्यावर बाणासारखी खूण असते.
धामण, दिवड, नानेटी (वासा), तस्कर, कवड्या, कुकरी, गवत्या, मांडूळ, वाळा सोमनाथ हे बिनविषारी साप मोठ्या प्रमाणावर आढळतात. धामण साप चपळ असून, उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य असल्याने त्याला शेतकऱ्यांचा मित्र समजले जाते. मात्र गैरसमजामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. दिवड हा पाण्यात, नाल्या-गटारांमध्ये राहतो. बरेचदा गटारातून तो टॉयलेटमध्येही येतो. कुकरीचे दात शेर्पाच्या कुकरीसारखे असतात. गवत्या साप हिरव्या गवतामध्ये राहतो. मांडूळला ग्रामीण भागात डबल इंजिन असेही म्हटले जाते.
डुरक्या घोणस हा मातीमध्ये राहतो. अजगरासारखा दिसणाºया या सापाचे शेपूट आखूड असते. वाळा सोमनाथ (कन्हा) हा गांडुळासारखा पण अतिवळवळ करणारा एक पूर्ण विकसित सापच असतो. तो जमिनीखाली किंवा फरशीखाली राहतो.
निमविषारी सापांमध्ये विदर्भात प्रामुख्याने मांजºया, हरणटोळ (ग्रीन वाईन्ड स्नेक), वेल्या साप (कॉमन ग्राँझ बॅक) आढळतात. त्यांच्या दंशामुळे मृत्यू होत नसला तरी विष अंगात भिणते. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. हरणटोळ हा साप हिरवा आणि वाळलेल्या झाडांच्या पानासारखा अशा दोन रंगात असतो. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे लांब असते. तो झाडावर राहतो. मांजºयाचे डोळे मांजरीसारखे असतात. त्याच्या डोळ्यात उभ्या बाहुल्या असतात.
नाग होते गोंडराजांचे राजचिन्ह
कोेया वंशीय गोंड समुदायातील लोक भूजंगाची उपासना करायचे. भूजंग पूजेला नागपूजा असे म्हटले जाते. गोंड राजांचे चिन्हही नागच होते. देवगडचे राजा जाटबा यांचे राजचिन्ह छिंदक नाग होते. वैरागडचे राजा कोंडासूर यांचे चिन्ह वेलिया होते. माणिकगडचे राजा माणकसिंह यांचे चिन्ह हीर नाग होते. कवर्धा राजनांदगाचे राजे भूरदेव यांचे चिन्ह पोलिसी नाग होते.
भूजंग महाराष्ट्राच्या सीमेवर
भूजंग अर्थात किंग कोब्रा या अतिजहाल विषारी सापाच्या वास्तव्याची नोंद आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटकातील जंगली भागांमध्ये झाली आहे. महाराष्ट्रात तो आढळत नसला तरी अलीकडे मात्र गडचिरोली-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील जंगलांमध्ये तो आढळत असल्याची नोंद आहे. १५ ते १८ फूट लांबीचा हा साप आकाराने मोठा असतो. जमिनीपासून साडेतीन ते चार फुटापर्यंत तो उभा होऊ शकतो. काही सर्प अभ्यासकांच्या मते, महाराष्ट्राच्या सीमेवर तो आढळणे ही त्याच्या वास्तव्याची संक्रमणावस्था मानली जाते.