नागपंचमीला सापाला पूजले, मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:10 AM2021-08-13T04:10:09+5:302021-08-13T04:10:09+5:30

नागपंचमी विशेष नागपूर : साप हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा महत्त्वाचा घटक आहे आणि मानवी अतिक्रमणामुळे ताेही जगण्यासाठी संघर्ष करताे आहे. ...

Nagpanchami worships the snake, then why is it killed on other days? | नागपंचमीला सापाला पूजले, मग इतर दिवशी का मारले जाते?

नागपंचमीला सापाला पूजले, मग इतर दिवशी का मारले जाते?

Next

नागपंचमी विशेष

नागपूर : साप हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा महत्त्वाचा घटक आहे आणि मानवी अतिक्रमणामुळे ताेही जगण्यासाठी संघर्ष करताे आहे. इतर प्राण्यांप्रमाणे सापांबाबतही श्रद्धा, अंधश्रद्धा जुळलेल्या आहेत. नागपंचमीचा सण तर खास नाग सर्पाला समर्पित आहे. मात्र नागपंचमीला पूजन करण्यासाठी साप महत्त्वाचे असताना इतर दिवशी त्यांच्या जीवावर का उठले जाते, हे मात्र अनाकलनीय आहे.

निसर्गाने निर्मिलेल्या प्रत्येक गाेष्टीचे काहीतरी महत्त्व आहे, तसे सापाचेही आहे. वास्तवात साप हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जाताे. तरीही भीतीपाेटी तर कधी माैज म्हणून सापाला मारले जाते. खरं म्हणजे काेणत्याही प्राण्याने केले नसेल तेवढे अतिक्रमण मानवाने निसर्गावर केले आहे. नागपूरचा विस्तार आज माेठ्या प्रमाणात झालेला दिसताे. पण काही वर्षांपूर्वी हा संपूर्ण परिसर जंगलाने व्यापला हाेता व अनेक प्रकारच्या जीवसृष्टीचा अधिवास त्यात हाेता. मग आता ते तुमच्या जवळ आले तर त्यांना मारण्याऐवजी संवर्धनाचे प्रयत्न करणे, हे आपले कर्तव्य आहे.

नागपूर जिल्ह्यात ७२ प्रजातीचे साप आढळतात. या सापांविषयी जनजागृतीची गरज असल्याची भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त हाेते.

जिल्ह्यात आढळणारे विषारी साप

नाग, मण्यार, रसेल वाईपर, फुरसे, घाेणस, चापडा, पट्टेरी मण्यार आदी. नाग सर्पाच्या चार प्रजाती नागपूर जिल्ह्यात आढळतात. निमविषारीपैकी मांजऱ्या, फाॅस्टेन मांजऱ्या, हरणटाेळ, अंडीभक्षक साप आदी प्रजाती आहेत.

जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप

तस्कर, अजगर, कवड्या, कुकरी, पट्टेरी कवड्या, गवत्या, धामण, पानदिवड, डुरक्या घाेणस, धाेंड्या, रुखई, वाडा, धुळ नागीण, नाॅनेटी (वास्या), मांढुळ आदी.

साप आढळला तर

सर्पमित्र शुभम पराळे यांनी सांगितले, घरी किंवा इतर ठिकाणी साप आढळल्यास सर्वात आधी त्याच्यापासून दूर राहून स्थिर राहणे याेग्य आहे. सापही माणसांना घाबरताेच. त्यामुळे घाबरून गाेंधळ करण्याचा प्रयत्न केला तर ताेही गोंधळून अंगावर येण्याची भीती आहे. साप काेणत्या प्रजातीचा आहे, हे बहुतेकांना माहीत नसते. रसेल वाईपरसारखे साप उडी घेऊन चावा घेऊ शकतात. त्यामुळे जवळ जाऊन काही करण्याचा प्रयत्न करू नका. सर्पमित्रांना संपर्क करा. संपर्क नसेल तर किमान १२ फुटाच्या काठीने दूर सारण्याचा प्रयत्न करा, पण मारू नका.

- काेणताही साप चावल्यास स्थिर राहा. घाबरून रक्तदाब वाढल्यास विष वेगाने पसरते. चावा घेतलेली जागा साबणाने धुवा आणि दाब देऊन विष काढण्याचा प्रयत्न करा.

साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र

साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. धान्य फस्त करणाऱ्या उंदीर, घुस आदी प्राण्यांना खाताे. ससे, माकडे, डुक्कर अशी पिकांची नासाडी करणारे प्राणी सापामुळे दूर पळतात. साप कीटकांनाही खातात. साप हा पिकांचे व घरी धान्याचे रक्षण करताे. त्यामुळे अंधश्रद्धा न बाळगता सापांना मारू नका, असे तज्ज्ञांचे आवाहन आहे.

साप हा काही देवधार्मिक घटक नाही तर साधा वन्यजीव आहे. त्यामुळे ताे मागे लागताे, बदला घेताे, नागमणी, हस्तकमणी यासारख्या अंधश्रद्धा बाळगू नका. ताे सहजासहजी कुणावर हल्ला करीत नाही. स्वरक्षणासाठीच ताे प्रयत्न करताे. सर्पमित्रांनीही स्टंटबाजी करण्याचा प्रकार टाळावा व सेवा म्हणून कार्य करावे. साप हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे व त्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे.

- शुभम पराळे, सर्पमित्र

Web Title: Nagpanchami worships the snake, then why is it killed on other days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.