नागपुरात औषध बाजारातील १० दुकाने जळून खाक , कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 08:33 PM2019-05-31T20:33:25+5:302019-05-31T21:40:43+5:30

हज हाऊसच्या बाजूला शुक्रवार तलाव, गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास ६० दुकानातील औषधांचा साठा जळाल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीत दहा दुकाने भस्मसात झाली. दुपारी ४ पर्यंत आग विझविण्याचे कार्य सुरू होते.

In Nagpur, 10 shops in the drug market burnt , crores of losses | नागपुरात औषध बाजारातील १० दुकाने जळून खाक , कोट्यवधींचे नुकसान

नागपुरात औषध बाजारातील १० दुकाने जळून खाक , कोट्यवधींचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे घडली घटना : ६० दुकानांना झळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हज हाऊसच्या बाजूला शुक्रवार तलाव, गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास ६० दुकानातील औषधांचा साठा जळाल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीत दहा दुकाने भस्मसात झाली. दुपारी ४ पर्यंत आग विझविण्याचे कार्य सुरू होते. 


प्राप्त माहितीनुसार, जेल गोडाऊनस्थित तळमाळ्यासह पाच मजली संदेश औषध बाजार विदर्भातील सर्वात मोठा असून या ठिकाणी औषधांची ३०० पेक्षा जास्त दुकाने आहेत. त्यापैकी १०० दुकाने आगीत सापडली. त्यातच ५० ते ६० दुकानांचे सर्वाधिक नुकसान झाले. या दुकानांमध्ये महागड्या औषधांचा साठा होता. याशिवाय हेल्थशी जुळलेले काही उपकरणे होती. तिसऱ्या माळ्यावरील औषधांचा फ्रिजर आगीत जळाला.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री २.१९ वाजता आग लागल्याचा फोन अग्निशमन विभागाला आला. दहा मिनिटातच गंजीपेठ येथील आगीचे बंब घटनास्थही पोहोचले. आग सर्वप्रथम पहिल्या माळ्यावरील पुनीत मेडिकल दुकानात शॉर्ट सर्किटने लागली. त्यानंतर विनायक एजन्सी, दिलीप मेडिकल स्टोअर्स, राम मेडिकल एजन्सी या दुकानांमध्ये आग वेगाने पोहोचली. प्रारंभी तिन्ही दुकाने पूर्णपणे जळाली. त्यानंतर आग वेगाने लगतची दुकाने आणि चारही माळ्यावर पोहोचली. चारही माळ्यावरील दुकानांना आग लागली. सर्वच दुकानांमधील एसी आणि फ्रीज आगीत सापडल्यामुळे कॉम्प्रेसर फुटले. त्यामुळे आग पुन्हा वेगाने पसरली. सर्वप्रथम आग ठक्कर यांच्या पुनीत मेडिकल स्टोअर्समध्ये लागल्याचे सुरक्षा गार्डने सांगितले. त्यांची चारही दुकाने भस्मसात झाली.
प्रारंभी विजेचे मेन स्वीच बंद करून अग्निशमन उपकरणांनी आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर इमारतीच्या भागात काळोख पसरला. पण आगीचे उग्र स्वरूप पाहता अग्निशमन विभागाला फोन करून रात्री २.१९ वाजता घटनेची माहिती देण्यात आली. रात्री सर्वच दुकानांना कुलूप असल्यामुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागला. घटनास्थळी ११ आगीचे बंब पोहोचले होते. दुपारी ४ वाजेपर्यंत आग विझविण्याचे कार्य सुरू होते.
एसी व कॉम्प्रेसर फाटल्यामुळे आग पसरली
मनपाच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, रात्रीपासून आग विझविण्याचे काम सुरू आहे. दुकानात औषधे आणि केमिकलचा मोठा साठा असल्यामुळे आगीने लगेचच उग्र रूप घेतले. एसी आणि कॉम्प्रेसर फाटल्यामुळे आग आजूबाजूच्या दुकानात पोहोचली. दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले . विभागाचे कर्मचारी रात्रीपासून आग विझविण्याचे काम करीत आहेत. आगीत किती नुकसान झाले, याची माहिती प्राप्त झाली नाही. आग पूर्र्णपणे विझल्यानंतरच नुकसानाचा आकडा पुढे येईल. माहितीनुसार, इमारतीतील प्रमाणित हायड्रंट आणि स्प्रिक्लर सिस्टीम प्रारंभी आग विझविण्यास कुचकामी ठरली. आग विझविण्यासाठी हज हाऊस, आशियन हॉटेल आणि गांधीसागर तलावातून पाण्याचा उपयोग करण्यात आला. रात्री अंधार पसरल्यामुळे कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी झुंजावे लागले.
रस्त्यावरून वाहतूक बंद
अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी इमारतीच्या समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कोणत्याही व्यापाऱ्याला इमारतीच्या आत जाण्यास परवानगी नव्हती. घटनास्थळी पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करीत होते.
प्लास्टिक आणि थर्माकोलने घेतला पेट
व्यापाऱ्यांनी सांगितले की, या इमारतीत औषध वितरकांची दुकाने आहेत. येथून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये औषधांची विक्री करण्यात येते. सध्या सायरप प्लास्टिकच्या बॉटलमध्ये तर टॅबलेट प्लास्टिक आवरणात येतात. महागडी औषधे थर्माकोड पॅकिंगमध्ये येतात. मे महिन्याचा शेवट असल्यामुळे सर्व वितरकांकडे औषधांचा मोठा साठा होता. सर्वच दुकानांमधील प्लास्टिक, थर्माकोल आणि रसायनांनी पेट घेतल्यामुळे इमारतीतून आगीचे लोळ निघत होते. सर्व दुकाने बंद असल्यामुळे आग कुठे पसरली, याचा अंदाज लावणे कठीण होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी वेळ लागला. कोणत्या दुकानात आणि गोडावूनमध्ये औषधे केवढ्या किमतीची होती, याचा अंदाज लावणे कठीण आहे. पण आगीत व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
रात्रीपर्यंत निघत होता धूर
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी रात्री दुकानांमधून धूर निघत होता. घटनास्थळी उपस्थित महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे कार्यकारी सदस्य हरीश गणेशानी यांनी सांगितले की, रात्री ८.३० वाजता अ‍ॅपेक्स फार्मा आणि त्याच्यालगतच्या तीन दुकानांमधून सतत धूर निघत होता. औषध बाजारातील भव्य इमारतीच्या एका भागात पाणी साचले आहे. गणेशानी यांच्यासह कौन्सिलचे अध्यक्ष अप्पाजी शेंडे, उपाध्यक्ष मुकुंद दुबे, नवल मानधनिया, राजेंद्र कवडकर, हेतल ठक्कर, हिमांशु पांडे यांनी औषध बाजाराची पाहणी केली.  दुसरीकडे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी अग्निशमन विभागाच्या कार्यशैलीवर टीका केली. अग्निशमन वाहनांच्या १०० फेऱ्यानंतरही आगीवर नियंत्रण का मिळवू शकले नाही, यावर त्यांनी सवाल उपस्थित केला. 

विमा बंधनकारक
इमारतीतील सर्वच दुकानदारांची बँकांमध्ये कॅश क्रेडिट (सीसी लिमीट) मर्यादा असल्यामुळे त्यांना दुकानातील औषधांचा फायर विमा काढणे बंधनकारक असते. पण हा विमा सीसीच्या प्रमाणात असतो. दर दिवशीच्या व्यवहारामुळे विम्याच्या तुलनेत सर्वच दुकानांमध्ये औषधांचा जास्त साठा होता. ज्यांची दुकाने जळाली, त्यांना विमा किती मिळेल, ही गंभीर बाब असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी दिली घटनास्थळाला भेट 


पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगीच्या घटनास्थळाला भेट देऊन आगीचे कारण जाणून घेतले. यासंदर्भात लवकरच योग्य तो कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी आ. सुधाकर कोहळे, नगरसेवक दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
महापौरही पोहोचल्या
आगीची सूचना मिळताच महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळी भेट दिली व आवश्यक सूचना दिल्या. यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, सभापती वर्षा ठाकरे, मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गनी खान आदींनीही घटनास्थळी भेट दिली.

औषधे विक्रेत्यांना तात्पुरता परवाना देणार
गंजीपेठ येथील ठोक औषध बाजाराच्या इमारतीमधील ज्या व्यावसायिकांच्या दुकानाला आग लागली आणि गांधीबाग औषध बाजारात ज्यांची दुकाने नाहीत त्यांना दोन ते तीन महिन्यांसाठी इतर ठिकाणाहून व्यवसाय करण्यासाठी तात्पुरता परवाना दिला जाईल. सोबतच वाचलेल्या औषधांची तपासणी करूनच नंतरच त्या औषधी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. अन्न व औषध प्रशासनाकडून आवश्यक ती मदतही व्यावसायिकांना दिली जाईल.
डॉ. राकेश तिरपुडे
सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन नागपूर

Web Title: In Nagpur, 10 shops in the drug market burnt , crores of losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.