नागपुरात मिरची १०० तर कोथिंबीर १२० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:03 AM2018-06-30T10:03:54+5:302018-06-30T10:04:17+5:30
खरीप हंगामामुळे नागपूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी तर बाहेरून जास्त आहे. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीप हंगामामुळे नागपूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी तर बाहेरून जास्त आहे. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले आहेत. सामान्यांसाठी वांगे, पत्ताकोबी, कोहळे, पालक, लवकी परवडणाऱ्या किमतीत आहे. पेरणीनंतर शेतकरी भाज्यांची लागवड करतील. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास भाव कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांकडून केवळ १० टक्के भाज्यांची आवक सुरू आहे. बहुतांश भाज्या नागपूर जिल्ह्याबाहेरून आणि अन्य राज्यातून येत असल्यामुळे सध्या भाज्या महाग आहेत. पत्ताकोबी वर्षभर मुलताई येथून विक्रीला येते. टोमॅटो संगमनेर, नाशिक या भागातून तर तोंडले, भिलई, रायपूर, दुर्ग येथून आणि गेल्या सात ते आठ वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातून कोहळे आणि हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात नागपूर बाजारपेठेत येत आहे.
परतवाडा येथून बारीक हिरव्या मिरचीची आवक आहे. तसे पाहिल्यास एक महिन्यापासून भाज्यांच्या किमती स्थिर आहेत. कॉटन मार्केटमध्ये दररोज लहानमोठ्या ६० ते ७० गाड्या आणि कळमन्यात १२० ट्रकची आवक आहे. पण किरकोळमध्ये दुप्पट आणि तिपटीच्या भावात विक्री होत असल्यामुळे गृहिणींना भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतात, अशी माहिती कॉटन मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.
फूलकोबी ४० रुपयांवर
कॉटन मार्केट आणि कळमना ठोक बाजारात भाज्यांची आवक चांगली असतानाही किरकोळमध्ये गृहिणींना भाज्या दुप्पट भावातच खरेदी कराव्या लागतात. काही भाज्यांमुळे गृहिणींचे बजेट वाढले आहे. कॉटन मार्केटमध्ये फूल कोबी २५ रुपये आणि हिरव्या मिरचीचे भाव ५० रुपये आहेत. पण किरकोळमध्ये फूलकोबी प्रति किलो ५० रुपये आणि हिरवी मिरची ८० ते १०० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागते. दुपटीच्या आकडेवारीनुसार किरकोळमध्ये वांगे प्रति किलो १५ रुपये, पत्ताकोबी ३० रुपये, कोहळे ३०, लवकी २०, भेंडी ५०, कारले ७०, तोंडले ४० ते ५० रु., सिमला मिरची ८०, चवळी शेंग ३५, गवार ४०, बीन्स ८०, परवल ६०, ढेमस ६०, पालक २५, चवळी भाजी ४०, मेथी ८० रु., काकडी ४०, मुळा ४०, गाजर ४०, फणस ६० आणि कैरीचे प्रति किलो भाव ३० ते ४० रुपये आहेत.
टोमॅटोही आले ४० वर
पावसामुळे कोथिंबीर खराब झाल्यामुळे भाव अचानक वाढले. स्थानिकांकडून आवक नगण्य आहे. सध्या कोथिंबीर नांदेड, छिंदवाडा, उमरानाला आणि रामकोना येथून विक्रीस येत आहे. आवक कमी असल्यामुळे कॉटन मार्केटमध्ये दर्जानुसार ७० ते ८० रुपये किलो विक्री सुरू आहे. किरकोळमध्ये १२० ते १३० रुपयांपर्यंत गृहिणींना खरेदी करावी लागत आहे. महिन्यापासून कमी असलेले टोमॅटोचे भाव किरकोळमध्ये ४० रुपयांपर्यंत वाढले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक बंद आहे. पण सध्या नाशिक, संगमनेर या भागातून नागपुरात वर्षभर टोमॅटो विक्रीस येतात.