CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:45 PM2020-06-04T23:45:42+5:302020-06-04T23:48:03+5:30
अमरावती व मध्य प्रदेशातून ‘सारी’वरील उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या व नंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या या दोन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. नागपुरात मृतांची संख्या १३ झाली आहे. आज आणखी १३ नव्या रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावती व मध्य प्रदेशातून ‘सारी’वरील उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या व नंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या या दोन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. नागपुरात मृतांची संख्या १३ झाली आहे. आज आणखी १३ नव्या रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ वर पोहचली आहे.
नागपुरात लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला असतानाच कोरोना प्रादुर्भावाचा जोर मात्र कायम आहे. मेयोच्या प्रयोगाशाळेत १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात भानखेडा येथील २७, ३६, ६० वर्षीय पुरुष तर ७१, ७५ वर्षीय महिला, टिमकी येथील ४५ व ६३ वर्षीय महिला, २७ व ४० वर्षीय पुरुष तर मोमिनपुरा येथील एक रुग्ण आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही रुग्ण अकोला येथील आहेत. एम्सच्या प्रयोगशाळेतही एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. लोकमान्यनगर येथील या ४३ वर्षीय पुरुष रुग्णाला एम्समध्येच भरती करण्यात आले. एम्सच्या कोविड वॉर्डात आता २७ रुग्ण उपचार घेत आहेत.
सारी-कोविडचे पाच मृत्यू
रुक्मिणीनगर अमरावती येथील ६५ वर्षीय परुष रुग्णाला ३ जून रोजी नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. हा रुग्ण ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’चा (सारी) होता. नियमानुसार सारीच्या रुग्णाची कोविड चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार ़सुरू असताना आज सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या शिवाय, मध्य प्रदेशातील सागर येथील ६२ वर्षीय महिला २ जून रोजी मेडिकलमध्ये दाखल झाली होती. ‘सारी’ची रुग्ण असलेली ही महिलाही कोविड पॉझिटिव्ह आली. उपचार सुरू असताना दुपारी २.३० वाजता तिचा मृत्यू झाला. एकाच दिवशी सारीच्या दोन रुग्णांच्या मृत्यूची ही पहिलीच वेळ आहे. या पूर्वी सारी-कोविड पॉझिटिव्हचे तीन मृत्यू झाले असून हा चौथा व पाचवा मृत्यू आहे. नागपुरातील रुग्णालयात नोंद झालेल्या सारीच्या ५००वर रुग्णांमधून आतापर्यंत १३ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.
मेयोतून १२ रुग्णांना डिस्चार्ज
मेयोतून १२ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजे सुटी देण्यात आली. यात अजनी, बांगलादेश, सावनेर, हंसापुरी, नाईक तलाव, सिरसपेठ येथील प्रत्येकी एक तर मोमिनपुरा, टिपू सुलतान चौक व कामठी येथील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. या रुग्णांसह आतापर्यंत ४१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २४०
दैनिक तपासणी नमुने १५४
दैनिक निगेटिव्ह नमुने १४३
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६२६
नागपुरातील मृत्यू १३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४१७
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,९३१
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,६१३
पीडित-६२६-दुरुस्त-४१७-मृत्यू-१३