Nagpur: आरटीई प्रवेशासाठी १५,३९८ अर्ज, ३१ मे पर्यंत मुदत, जिल्ह्यातील ६५५ शाळांत ६९२० जागा
By गणेश हुड | Published: May 25, 2024 09:40 PM2024-05-25T21:40:31+5:302024-05-25T21:42:56+5:30
Education News: उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जुन्या पद्धतीने ‘आरटीई’च्या प्रवेश अर्जप्रक्रिया सुरू आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६ हजार ९२० जागांसाठी १५ हजार ३९८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
- गणेश हूड
नागपूर - उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जुन्या पद्धतीने ‘आरटीई’च्या प्रवेश अर्जप्रक्रिया सुरू आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६ हजार ९२० जागांसाठी १५ हजार ३९८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
३१ मेपर्यंत ही अर्ज दाखल करता येणार असून अर्जांची संख्या २५ हजारांच्या पुढे जाईल असे शिक्षण विभागातील काहींचे म्हणणे आहे. ऑनलाइन पोर्टल सुरू होताच पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी धाव घेतली आहे. राज्याचा विचार केल्यास नागपुरात अर्जासाठीचा प्रतिसाद अधिक पाहायला मिळत आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी हे प्रवेश होत आहेत. या नव्या आदेशाने एक किमीच्या आतील शाळांची अट होती. ती अटसुद्धा शिथिल केली गेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ सी (१) नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना २५ टक्के जागांवर इंग्रजी व विनाअनुदानित शाळेत प्रवेश दिला जात आहे. यात शहरासह जिल्ह्यातील ६५५ शाळांचा समावेश आहे.