नागपूर १५ आॅगस्ट १९४७!
By Admin | Published: August 15, 2015 02:56 AM2015-08-15T02:56:52+5:302015-08-15T02:56:52+5:30
स्वातंत्र्यांची अनुभूती घेताना नागपूरकरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सायकलस्वार घंटी वाजवून आनंद व्यक्त करीत होते. ढोल-ताशे वाजत होते.
स्वातंत्र्यांची अनुभूती घेताना नागपूरकरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सायकलस्वार घंटी वाजवून आनंद व्यक्त करीत होते. ढोल-ताशे वाजत होते. नागपुरातील लहान-थोर प्रत्येक जण एकमेकांचे अभिनंदन करीत होते. घराघरांवर रोषणाई होती. कारणही तसेच होते ! १५ आॅगस्ट १९४७ ! भारत स्वतंत्र झाला होता !
१४ आॅगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक भाषण केले. ‘मध्यरात्रीच्या ठोक्याला सारे जग निद्रेत असताना भारत स्वातंत्र्य व जीवनासाठी जागा होत आहे’.
पंडित नेहरूंच्या या भाषणातील चित्र नागपुरात पाहायला मिळाले. या घटनेच्या आठवणीने अनेकांच्या अंगावर अजूनही रोमांच उभे राहतात व त्या वातावरणाचे वर्णन करताना त्यांचा कंठ दाटून येतो. १८१८ मध्ये पेशवाई बुडाल्यानंतर खऱ्या अर्थाने इंग्रजांनी सारा भारत काबीज केला. परंतु त्यावेळी नागपूर इंग्रजांच्या ताब्यात आले नव्हते. दुसरे रघुजी भोसले यांच्या दूरदृष्टी, राजकीय कौशल्य व पराक्रमामुळे इंग्रजांना नागपूरवर युनियन जॅक लावायला आणखी २५ वर्षे लागली. १८५३ मध्ये नागपूरकर भोसल्यांचे राज्य खालसा झाले व नागपूरच्या महाल येथील किल्ल्यावर भगवा जरीपटक्याच्या जागी युनियन जॅक फडकू लागला.
मध्यरात्री तोफांची सलामी
तिरंगा ध्वज १४ आॅगस्टला रात्री ठीक १२ वाजता सीताबर्डीच्या किल्ल्यावर फडकविण्यात आला. तोफांची सलामी देण्यात आली. तोफांच्या सलामीने सर्व नागपूरकरांना तिरंगा फडकल्याचे समजले व जल्लोषाला सुरुवात झाली. इंग्रजांची सत्ता खऱ्या अर्थाने संपली अन् भारत स्वतंत्र झाला होता.
तेव्हापासून नागपूरची जनता इंग्रजांच्या गुलामगिरीत गेली. इंग्रजांनी भारत सोडून जाण्याची अधिकृत घोषणा २६ फेब्रुवारी १९४७ ला केली. मार्च १९४६ मध्ये मध्य प्रांतांच्या निवडणुका झाल्या व पंडित रविशंकर शुक्ला ‘प्रधानमंत्री’ झाले. (त्यावेळी मुख्यमंत्र्यांना ‘प्रधानमंत्री’ म्हटले जात होते) त्यांच्या मंत्रिमंडळात द्वारकाप्रसाद मिश्रा, दुर्गाशंकर मिश्रा, एस. व्ही. गोखले, आर. के. पाटील, पी. के. देशमुख, डॉ. डब्ल्यू. एस. बारलिंगे व डॉ. एम. हसन यांचा समावेश होता. देश स्वतंत्र झाला त्यावेळी शुक्ला मंत्रिमंडळच सत्तेत होते. १४ आॅगस्ट १९४७ ला या मध्य प्रांताचे गव्हर्नर फ्रेड्रीक बर्न यांना निरोप देण्यात आला. त्यासोबत इंग्रजांची सत्ता लयाला गेली. त्यांची जागा नव्या भारतीय गव्हर्नरने घेतली. या प्रांताचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून मंगलदास मंचाराम पक्वासा यांची नियुक्ती झाली.
गव्हर्नर दुपारी मुंबईहून नागपुरात आले व सायंकाळी गव्हर्नरपदाची शपथ घेतली. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले अनेकजण तुरुंगात होते. त्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा समारंभ पाहता यावा, यासाठी आठ दिवसांपूर्वीच त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्यामुळे वातावरणात एक नवाच आनंद होता. शहरातील इतर चौकांमध्ये विजयोत्सव सुरू झाला होता. कॉटन मार्केट, इतवारी, टिळक पुतळा, महालसह शहरातील सर्वच भागातून लोक रस्त्यावर आले. ‘भारत माता की जय’, ‘महात्मा गांधी की जय’ हेच शब्द प्रत्येकजण उच्चारत होता. अनेकजण साखर वाटत होते. रात्रीची नीरवता संपली होती. स्वातंत्र्याच्या सूर्योदयाची आस सर्वांना लागली होती. (प्रतिनिधी)