नागपुरात २०० ओला कॅब सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 08:25 PM2018-09-18T20:25:48+5:302018-09-18T20:28:56+5:30
पाच रुपये बोनस देण्याच्या मुख्य मागणीला घेऊन मंगळवारी ओला कंपनी अंतर्गत कार टॅक्सी सेवा देणाऱ्या सुमारे दोनशे चालकांनी आपली सेवा थांबविली. कस्तुरचंद पार्क मैदानावर दुपारी एक वाजता हे टॅक्सी चालकांनी आंदोलन करीत लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच रुपये बोनस देण्याच्या मुख्य मागणीला घेऊन मंगळवारी ओला कंपनी अंतर्गत कार टॅक्सी सेवा देणाऱ्या सुमारे दोनशे चालकांनी आपली सेवा थांबविली. कस्तुरचंद पार्क मैदानावर दुपारी एक वाजता हे टॅक्सी चालकांनी आंदोलन करीत लक्ष वेधले.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यामुळे की काय, बहुतांश प्रवासी ‘कॅब सेवे’ला प्राथमिकता देत आहे. परिणामी, फार कमी काळात या सेवेला महत्त्व आले आहे. नागरिकांना जिथे माफक दरात परिवहन सेवा उपलब्ध होत आहे, तिथे कंपनीला चांगला फायदाही मिळत आहे. परंतु १२ ते १४ तास वाहन चालवूनही चालकांना यातून नफा मिळत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, कंपनीने बोनसची रक्कम दोन रुपये केली आहे. यामुळे डिझेल व वाहनाचे भाडेही निघत नाही. उलट खिशातून पैसे भरावे लागतात. यातच वाहनाला काही झाल्यास २५०० रुपये ‘पेनाल्टी’ लावली जाते. नैसर्गिक किंवा चूक नसताना अपघात झाल्यास त्याची जबाबदारीही चालकांवर येते. कंपनीने प्रतिदिवस २५०० रुपये व्यवसाय देण्याचे आश्वासनही फोल ठरले आहे. या व्यवसायातून १००-२०० रुपयेही मिळत नसल्याने अनेकांना घरचालविणे कठीण झाले आहे.
सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या अधिक
‘कॅब’ सेवामध्ये टॅक्सी चालविणारे सर्वाधिक सुशिक्षीत बेरोजगारांचा समावेश आहे. रोजगार मिळण्यासोबतच वाहनाचे मालकीत्व मिळेल या आशेने हे युवक या कॅब सेवेशी जुडले. त्यांना जे स्वप्न दाखविले, ते आता पूर्ण होत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. कंपनीने पाच वर्षांच्या लीजवर वाहन देतावेळी प्रत्येक चालकाकडून २५ हजार रुपये घेतले होते. सोबतच ७७० रुपये प्रतिदन भाडे घेतले जाते. लीज संपल्यावर ५२ हजार रुपये देण्याचे आणि चालकाच्या नावे वाहन करण्याचा करार आहे. परंतु सध्याच्या स्थितीत पाच वर्षांपर्यंत वाहन चालविणे कठीण झाल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
प्रवाशांची उडाली तारांबळ
एकाचवेळी २००वर ओला कॅबच्या चालकांनी आपली सेवा बंद पाडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेकांना ऐनवेळी आॅटोरिक्षा किंवा शहर बससेवेची मदत घ्यावी लागली. परिणामी, आज या दोन्ही वाहतूक सेवेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आढळून आले. काहींनी याचा फायदा मनमानी प्रवासी भाडे आकारल्याच्या तक्रारी आहेत.