Nagpur | २९ दिवसांत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण; कोरोनामुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 12:56 PM2022-07-30T12:56:18+5:302022-07-30T12:59:12+5:30
मृत्यूचे ऑडिटच नाही
नागपूर : कोरोनापाठोपाठ स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या वर्षात स्वाइन फ्लूच्या ४० रुग्णांची नोंद झाली. यातील ३४ रुग्ण हे मागील २९ दिवसांतील आहेत. शिवाय, सलग तिसऱ्यादिवशी कोरोना मृत्यूची नोंद झाल्याने व २१५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात २००९ पासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. २०१७ मध्ये या रोगाने सर्वाधिक ११९ रुग्णांचे जीव गेले. मात्र, मागील दोन वर्षांत केवळ सहाच रुग्णांची नोंद असताना, आता पुन्हा या रोगाने डोके वर काढले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत सहा रुग्ण, तर, १ ते २९ जुलैदरम्यान ३४ रुग्ण आढळून आले आहेत. यातील २७ रुग्ण शहरातील असून, १३ रुग्ण हे ग्रामीण भागातील व इतर जिल्ह्यांतील आहेत.
- स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचे मृत्यू
स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. परंतु त्याचे ‘डेथ ऑडिट’ झालेले नाही. उपसंचालक आरोग्य विभागाची लवकरच यावर बैठक होणार आहे. त्यानंतरच मृत्यूबाबतची घोषणा होणार असल्याचे संबंधित आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
-कोरोनाचे शहरात १४२, तर ग्रामीणमध्ये ७३ रुग्ण
शुक्रवारी कोरोनाच्या २ हजार १६६ चाचण्या झाल्या. यात शहरातून १४२, तर ग्रामीणमधून ७३ असे एकूण २१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्या तुलनेत २१७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार १६६ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील १ हजार ५८६ रुग्ण गृह विलगीकरणात, तर ७६ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
- गांधीबाग झोनमधील कोरोना रुग्णाचा मृत्यू
कोरोनामुळे मृत्यू झालेला ४० वर्षीय रुग्ण हा मनपाच्या गांधीबाग झोनमधील रहिवासी होता. कामठी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला मूत्रपिंडाचा जुना विकार होता. मृत्यूची एकूण संख्या १० हजार ३३४ वर पोहोचली आहे.
- स्वाइन फ्लूची स्थिती (जानेवारी ते २९ जुलै)
: शहरात २७ रुग्ण
: नागपूर ग्रामीण व इतर जिल्ह्यात १३ रुग्ण
- कोरोनाची स्थिती (शुक्रवार)
: २१५ रुग्ण पॉझिटिव्ह
: ०१ पुरुष रुग्णांचा मृत्यू