नागपूर @ ३.५ : थंडीने तोडला ८१ वर्षांचा रेकॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 08:36 PM2018-12-29T20:36:51+5:302018-12-29T20:37:45+5:30
थंडीने नागपुरात ८१ वर्षातील सर्व रेकॉर्ड तोडत नागपूरकरांना गारठून सोडले आहे. शनिवारी सकाळी पारा तब्बल ३.५ अंशांपर्यंत खाली घसरला व नागपूरच्या शतकीय इतिहासात थंडीचा एक नवा रेकॉर्ड नोंदविल्या गेला. पारा सामान्यापेक्षा ९ अंशांनी खाली घसल्यामुळे अतिशीतलहर सारखी स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थंडीने नागपुरात ८१ वर्षातील सर्व रेकॉर्ड तोडत नागपूरकरांना गारठून सोडले आहे. शनिवारी सकाळी पारा तब्बल ३.५ अंशांपर्यंत खाली घसरला व नागपूरच्या शतकीय इतिहासात थंडीचा एक नवा रेकॉर्ड नोंदविल्या गेला. पारा सामान्यापेक्षा ९ अंशांनी खाली घसल्यामुळे अतिशीतलहर सारखी स्थिती निर्माण झाली आहे.
नागपुरात ७ जानेवारी १९३७ रोजी ३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. ते आजवरचे सर्वात कमी तापमान होते. यानंतर २९ डिसेंबर २०१४ रोजी पारा ५ अंशांपर्यंत घसरला होता. मात्र, शनिवारी थंडीने सर्व रेकॉर्ड तोडले. आजवरच्या इंतिहासात सर्वात थंड दिवस अशी नोंद झाली. नागपुरात गेल्या ४८ तासात तापमानात झपाट्याने घट झाली. वाढत्या थंडीमुळे नागरिकांसह पशुपक्ष्यांना त्रास सुरू झाला आहे.
नागपुरात डिसेंबर व जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडते. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पारा सामान्य स्तरावर राहिला. दुसऱ्या पंधरवड्यात मात्र हवामानात बदल होऊन कडाक्याची थंडी सुरू झाली. २२ डिसेंबर २०१८ रोजी नागपूर तापमान ६.३ अंशांपर्यंत खाली आले होते. नंतर पारा हळू हळू वर सरकला व १०.९ अंशांपर्यंत पोहोचला. उत्तर भारतातून अचानक आलेल्या थंड वाºयांमुळे वातावरण बदलले. २८ डिसेंबर रोजी पुन्हा तापमान घटून ५.७ अंश झाले. शीतलहर येथेच थांबली नाही तर २४ तासात यात पुन्हा २.२ अंशांची घट झाली व पारा ३.५ अंशांवर पोहोचला.
शेजारी राज्यांमध्येही थंडीचा कडाका
शेजारील राज्य मध्यप्रदेशमध्ये देखील थंडीचा कडाका कायम आहे. पचमढी येथे १, बैतुल १, खजुराहो १.४, उमरिया १.७, उज्जैन २.५, दतिया २.६, दमोह ३ व नौगांव मध्ये ३.१ अंशांपर्यंत तापमान खाली आले आहे. छत्तीसगडमध्येही शीतलहर सुरू आहे.
उत्तरेतील थंड वाऱ्याचा परिणाम
उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू-काश्मिरात बऱ्याच ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे. राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मध्यभारताला गारठून सोडले आहे.
४८ तासात पारा ७.४ अंश घसरला
दिनांक तापमान
२७ डिसेंबर १०.९
२८ डिसेंबर ५.७
२९ डिसेंबर ३.५
सर्वाधिक किमान तापमान
दिनांक तापमान
२९ डिसेंबर २०१८ ३.५
७ जानेवारी १९३७ ३.९
२९ जिडसेंबर २०१४ ५.०
२८ डिसेंबर १९८३ ५.७
२८ डिसेंबर २०१८ ५.७
विदर्भात शीतलहर
जिल्हा तापमान
नागपूर ३.५
अकोला ५.९
गोंदिया ६.०
ब्रह्मपुरी ७.०
बुलडाणा ७.८
वर्धा ८.४
वाशिम ८.६
यवतमाळ ९.०
चंदपूर ९.०
अमरावती ९.६
गडचिरोली १०.२