नागपुरात ३७ ब्लॅक स्पॉट, ६१२ अपघात, २६४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:41 PM2018-04-23T19:41:22+5:302018-04-23T19:41:38+5:30

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.

In Nagpur, 37 black spots, 612 accidents, 264 deaths | नागपुरात ३७ ब्लॅक स्पॉट, ६१२ अपघात, २६४ मृत्यू

नागपुरात ३७ ब्लॅक स्पॉट, ६१२ अपघात, २६४ मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ६९ ‘ब्लॅक स्पॉट : सारेच काही धक्कादायक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.
मागील तीन वर्षांत ज्या ठिकाणी पाच रस्ते अपघात झाले आहेत व अपघातांमध्ये व्यक्ती जखमी किंवा मृत झाली आहे किंवा मागील तीन वर्षांत रस्ते अपघातात १० व्यक्ती मरण पावल्या आहेत ते अपघात स्थळ ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित केले जाते. गेल्या वर्षी शहरात असे ४५ तर ग्रामीण भागात ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या पाहणीत शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये घट होऊन त्याची संख्या ३७ वर आली आहे. परंतु या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत झालेले अपघात व त्यामुळे जीव गमावून बसलेल्यांचा आकडा धक्कादायक आहे. सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय ‘ब्लॅक स्पॉट’ला किती गंभीरतेने घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाहतूक शाखा क्र १ : अपघाताचे ठिकाण ११ , मृत्यू ८९
शहरात सर्वाधिक ‘ब्लॅक स्पॉट’ हे वाहतूक शाखा क्र. १ अंतर्गत येणाऱ्या भागात आहेत. येथे ११ ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी झालेल्या अपघातात ८९ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक आठवा मैल पोलीस स्टेशन वाडी या ‘स्पॉट’वर झालेल्या ३५ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू, वाडी टी पॉर्इंटवर झालेल्या ५१ अपघातांमध्ये २१ जणांचा मृत्यू, वडधामणा ठिकाणी झालेल्या २२ अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू, राजीवनगर ठिकाणी झालेल्या २५ अपघातांमध्ये आठ मृत्यू व आयसी चौक ठिकाणी झालेल्या १९ अपघातांमध्ये पाच मृत्यू झालेले आहेत. या शिवाय, डोंगरगाव, गौसे मानापूर, त्रिमूर्तीनगर, सुभाषनगर व छत्रपतीनगर या अपघाताच्या ठिकाणी एकूण ४५ अपघात झाले असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
वाहतूक शाखा क्र. २: अपघाताचे ठिकाण १२, मृत्यू ६५
वाहतूक शाखा क्रमांक दोन अंतर्गत जीपीओ चौक, महाराजबाग, छत्रपती चौक, माता कचेरी चौक, परसोडी गाव, धंतोली पूल, व्हेटर्नरी कॉलेज, राजभवन गेट, कॅम्प चौक, एलआयसी चौक, पागल खाना चौक व काटोल रोड या ‘ब्लॅक स्पॉट’वर ६६ अपघात झाले. यात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाहतूक शाखा क्र. ३, ४ : अपघाताचे ठिकाण ६, मृत्यू २२
वाहतूक शाखा क्रमांक तीनमध्ये मेहंदीबाग ओव्हर ब्रीज हा एकच ‘ब्लॅक स्पॉट’ आहे. येथे गेल्या तीन वर्षांत सहा अपघात झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर क्रमांक चारमध्ये पाच अपघाताचे ठिकाण आहेत. यात म्हाळगीनगर चौक, चामट चक्की चौक, मानेवाडा चौक व परिसर, विहीरगाव पूल व वाठोडा चौक व परिसर असून या अपघाताच्या ठिकाणी ४० अपघात झाले असून १८ जण मृत्युमुखी पडले आहेत.
वाहतूक शाखा क्र. ५ : अपघाताचे ठिकाण ८, मृत्यू ८८
वाहतूक शाखा क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या आठ अपघाताच्या ठिकाणी ३०३ अपघात झाले असून ८८ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक, ६६ अपघात जुना पारडी नाका येथे झाले असून १८ जण मृत्युमुखी पडले. जरीपटका रिंगरोड चौकात ३७ अपघात झाले असून ९ जण बळी पडले. मारुती शो रुम चौकात ४६ अपघात झाले, यात ११ जणांचा मृत्यू झाला. उप्पलवाडी पूल येथे झालेल्या ३८ अपघातांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. विटा भट्टी येथे ३२ अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू तर प्रकाश हायस्कूल ते कापसी पूल दरम्यानच्या ‘ब्लॅक स्पॉट’वर ६६ अपघात झाले असून २७ जण मृत्युमुखी पडले आहेत.
‘ब्लॅक स्पॉट’ शून्यावर आणणार
गेल्या काही वर्षांपासून ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करण्यावर आमचा जोर राहिला आहे. त्यात यश आल्यानेच गेल्या वर्षी ४५ असलेले ब्लॅक स्पॉट या वर्षी ३७ वर आले आहेत. यावर्षी हा आकडा शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शरद जिचकार
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

 

Web Title: In Nagpur, 37 black spots, 612 accidents, 264 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.