नागपुरात ४१८० विद्यार्थ्यांचा मनपा शाळेला टाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:50 PM2018-05-11T14:50:36+5:302018-05-11T14:54:07+5:30
खालावलेला शिक्षणाचा दर्जा व पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. गेल्या पाच वर्षात ४१८० पटसंख्या कमी झाल्याने महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा बंद पडल्या आहेत. शाळा बंद पडत असल्याने भविष्यात शिक्षकांच्या नोकरीवर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नोकरी वाचवण्यासाठी आता शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. यासाठी नगरसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खालावलेला शिक्षणाचा दर्जा व पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. गेल्या पाच वर्षात ४१८० पटसंख्या कमी झाल्याने महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा बंद पडल्या आहेत. शाळा बंद पडत असल्याने भविष्यात शिक्षकांच्या नोकरीवर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नोकरी वाचवण्यासाठी आता शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. यासाठी नगरसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या काही शाळांचा अपवाद वगळता बहुसंख्य शाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. मागील काही वर्षात पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढला आहे. सुविधांचा अभाव व प्रशासनाची उदासीन भूमिका यामुळे शिक्षण विभागात मरगळ आली आहे. २०१३-१४ या वर्षात महापालिकेच्या ७४ मराठी प्राथमिक शाळा होत्या. आता ही संख्या ४९ पर्यंत खाली आली आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पटसंख्या आणखी क मी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे.
मोलमजुरी करणाऱ्या पालकांनाही आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घ्यावे असे वाटते. गेल्या दोन वर्षात महापालिकेच्या शाळेतही इंग्रजी शिक्षण सुरू झाले आहे. पण खासगी शाळांच्या तुलनेत प्रतिसाद कमी आहे. याचा विचार करता शिक्षकांना प्रशिक्षित करून, प्रभागा-प्रभागात कार्यक्रमांचे आयोजन करून पालकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. विद्यार्थी मिळावे म्हणून शिक्षकांना सध्या घरोघरी विद्यार्थी शोधत फिरावे लागणार आहे.
नगसेवकांची मदत घेणार
४नगरसेवकांचा परिसरात चांगला संपर्क असल्याने विद्यार्थी शोधण्याच्या या मोहिमेत नगरसेवकांची मदत घेतली जाणार आहे. याबाबतच्या सूचना त्यांना करण्यात येतील. पुढील सत्रासाठी पहिल्या वर्गात सहा हजार विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी झाली आहे, अशी माहिती शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.
दर्जा उंचावण्याचा प्रयत्न
४महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा यासाठी शिक्षण समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षकांना प्रशिक्षण, शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. ३६ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक उपक्र म हाती घेण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची घटलेली पटसंख्या
वर्ष विद्यार्थी
२०१४-१५ १५४१
२०१५-१६ ९५०
२०१६-१७ १०९७
२०१७-१८ ५९२
एकूण ४१८०