नागपूर @ 43.6
By Admin | Published: April 4, 2016 05:36 AM2016-04-04T05:36:44+5:302016-04-04T05:36:44+5:30
उष्णतेत बऱ्यापैकी वाढ झाली असून रविवारी नागपूरचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून हे सर्वाधिक
नागपूर : उष्णतेत बऱ्यापैकी वाढ झाली असून रविवारी नागपूरचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून हे सर्वाधिक तापमान ठरले. सामान्यापेक्षा ५ अंश सेल्सिअस अधिक तापमान असल्यामुळे उन्हाचे चटके जाणवले. मागील २४ तासात कमाल तापमान १.६ अंशाने वाढले. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात गर्मीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ४३.८ अंश सेल्सियस तापमान असल्यामुळे अकोल्यातही उष्णतेचे चटके जाणवले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार वातावरणात आर्द्रता कमी झाल्यामुळे आणि आकाश स्वच्छ असल्यामुळे तापमानात अचानक वाढ होत आहे. परंतु पाकिस्तान आणि पश्चिम राजस्थान दरम्यान एका कमी दाबाचे क्षेत्र मागील काही दिवसांपासून तयार झाले आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशापासून उत्तर कर्नाटक दरम्यान उच्च दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशावर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विदर्भाच्या काही भागात आगामी २४ तासात जोराच्या वादळासह पाऊस येऊ शकतो. परंतु त्यानंतर पुन्हा मध्य भारतात उष्णतेची लाट येणार आहे. सध्या संपूर्ण विदर्भात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. विदर्भात अकोल्यानंतर नागपूर सर्वाधिक उष्ण शहर ठरले. त्याच प्रमाणे वर्धा कमाल तापमान ४३.५, चंद्रपूर ४२.८, ब्रह्मपुरी ४२.८, यवतमाळ ४२, बुलडाणा ४०.६,गोंदिया ४०.२ आणि वाशिममध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.(प्रतिनिधी)
हवामान खात्याचा अंदाज चुकला
नागपुरात पहिल्यांदा ‘हीट अॅक्शन प्लॉन’वर काम होत आहे. नागपूर महानगरपालिकेला यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या आकड्यांच्या आधारे महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येतात. परंतु हवामान खात्याकडून आगामी ५ दिवसात जे आकडे उपलब्ध करून देण्यात आले, त्यात तापमान ४३.६ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता नव्हती. हवामान खात्याच्या आकड्यांच्या आधारे महापालिकेला काम करावे लागणार आहे. परंतु हवामान खात्याने दिलेले आकडेच रविवारी चुकल्यामुळे रविवारी ‘प्लॉन’वर काम होऊ शकले नाही.
पाणपोईचा शुभारंभ, जनजागरण सुरू
महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी मान्य केले की, हवामान खात्याने उपलब्ध करून दिलेल्या आकड्यात तापमान ४३ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली नव्हती. परंतु तरीसुद्धा महापालिकेच्या झोन कार्यालयांतर्फे ठिकठिकाणी पाणपोई लावण्यात येत आहे. जनजागृतीसाठी बॅनर,पोस्टर लावण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन महापालिका आणि नासुप्रच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांची कामे निश्चित करण्यात आली आहेत.