नागपूर @ ४५.६; ऑरेंज अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:49 AM2019-05-22T09:49:12+5:302019-05-22T09:49:37+5:30
अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर मंगळवारी उपराजधानीत अनुभवायला आला. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला चटके देत होती. दुपारी तर सूर्य आगच ओकतो की काय अशी अवस्था होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर मंगळवारी उपराजधानीत अनुभवायला आला. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला चटके देत होती. दुपारी तर सूर्य आगच ओकतो की काय अशी अवस्था होती. त्यामुळे कमाल तापमान गेल्या २४ तासात १.४ डिग्रीने वाढत ४५.६ वर गेले होते. सामान्यत: तापमान तीन डिग्रीवर गेल्याने गर्मीने बेचेन केले होते. यावर्षी तापमानाने ४६.३ डिग्रीचा पल्ला गाठला आहे. मे महिन्यातील उरलेल्या दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने २१ व २२ मे ला रेड अलर्ट घोषित करून तापमान ४ ते ५ डिग्रीने वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता. हवामान खात्याच्या वेबसाईटवरून अलर्ट हटला. पण मंगळवारी तापमान अचानक वाढले. हे लक्षात घेता हवामान खात्याने विदर्भातील सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. यात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, अकोला व गडचिरोलीचा समावेश आहे.
नागपुरात तुरळक पाऊस
दिवसभर शहरातील नागरिकांनी अंग भाजणारा उकाडा सहन केल्यानंतर, सायंकाळी मात्र पावसाने काही उसंत दिली. काही मिनिट का होईना तुरळक पाऊस झाल्याने, वातावरण काहिसे आल्हाददायक झाले. मात्र पावसामुळे थोडा उकाडा वाढला.