नागपुरात आठवड्याभरात पारा जाणार ४७ वर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:09 PM2019-05-16T22:09:09+5:302019-05-16T22:09:54+5:30
२३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने एकीकडे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. तर दुसरीकडे सूर्याचा प्रकोप वाढत असून पुढील आठवडा नागपूरकरांची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे ‘हीट वेव्ह’ची तीव्रता वाढणार असून २१ मेनंतर तापमानाचा पारा ४७ अंशांहून अधिक जाण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने एकीकडे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. तर दुसरीकडे सूर्याचा प्रकोप वाढत असून पुढील आठवडा नागपूरकरांची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे ‘हीट वेव्ह’ची तीव्रता वाढणार असून २१ मेनंतर तापमानाचा पारा ४७ अंशांहून अधिक जाण्याची शक्यता आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात पारा वाढलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशात तुरळक ढगदेखील दिसून येत असून त्यामुळे उकाडा जास्त प्रमाणात जाणवून येतो आहे. गुरुवारी शहरातील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मात्र आता तापमान वाढण्याची शक्यता असून २० मे रोजी ४६ अंश तर २१ मे नंतर ४७ अंशापर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. शिवाय गरम वाऱ्यांमुळे गरमीचा प्रकोप जास्त प्रमाणात जाणविण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळी ८ पासूनच उकाडा
शहरात सकाळी ८ वाजल्यापासून गरमी दिसून येत आहे. दिवसाच्या सुरुवातीपासूनच उकाडा जाणवून येत आहे. दिवसभर रस्त्यांवर वाहने चालविणे अतिशय कठीण काम झाले आहे. विशेषत: दुचाकीस्वारांसाठी तर गाडी चालविणे दिव्यच आहे.
किमान तापमानदेखील वाढणार
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हवामान सेवा केंद्राच्या अंदाजाप्रमाणे १९ मेपर्यंत शहरातील किमान तापमान ३० अंश सेल्सिअसहून अधिक राहू शकते. शिवाय २१ मे नंतर कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसहून अधिक जाऊ शकते. शिवाय तुरळक ढग असल्याने उकाडा जास्त प्रमाणात जाणवू शकतो.