नागपूर ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:52 PM2018-07-23T22:52:47+5:302018-07-23T22:55:55+5:30
६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हाही १५८ व ४० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तेव्हाचाही दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हाही १५८ व ४० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तेव्हाचाही दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढतो आहे.
शहरात एकीकडे कोट्यवधीचे सिमेंट रोड बनत आहेत. महामार्गाचेही काम झपाट्याने सुरू आहे. पण ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यातच ६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागातील रस्त्यांची धुळधाणच झाली आहे. याचा सर्वाधिक फटका हिंगणा तालुक्यातील रस्त्यांना बसला आहे. त्याचबरोबर जवळपास १८० कालवे, लहान पूलसुद्धा पावसामुळे नादुरुस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने रस्त्यांचा सर्वे करून दुरुस्तीसाठी ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे.
यापूर्वी २०१३-१४ मध्येसुद्धा अतिवृष्टीने ८०३ रस्ते व ३०६ पुलांची दुरवस्था झाली होती. त्यावेळी दुरुस्तीसाठी १५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यातून केवळ ३२ कोटी रुपये निधी जि.प.ला प्राप्त झाला होता. २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीने १८३ रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हा ४० कोटी ८० लाखाचा प्रस्ताव पाठविला होता. हा सुद्धा निधी मिळाला नाही.
तालुकानिहाय रस्त्यांची दुरवस्था
तालुका रस्ते पूल दुरुस्तीचा प्रस्ताव
नागपूर २८ १२ १० कोटी २० लाख
हिंगणा ३० २१ १४ कोटी ५० लाख
कळमेश्वर २८ ७ ११ कोटी ४ लाख
काटोल २० ४ ६ कोटी ९० लाख
नरखेड २१ ० ९ कोटी
सावनेर १३ ९ ४ कोटी ३० लाख
पारशिवनी १७ ६ ४ कोटी ६५ लाख
रामटेक १६ १६ ४ कोटी ८ लाख
मौदा २४ १९ ८ कोटी २६ लाख
कामठी १६ ५ ७ कोटी ६० लाख
उमरेड २४ १९ ७ कोटी २३ लाख
भिवापूर ३७ ३५ १४ कोटी ८२ लाख
कुही ४३ २७ १२ कोटी ६७ लाख
शासनाचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
२०१३ पासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाचा जि.प. प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला. शासनाकडून केवळ ३२ कोटीचा तोकडा निधी प्राप्त झाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था आहे. ६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे तर रस्त्याची दैनावस्था झाली आहे. ११५ कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था लक्षात घेता शासनाने तातडीने निधी मंजूर करावा.
शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.