नागपुरात भरती झाल्यानंतर २४ तासामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:37 AM2020-08-24T11:37:23+5:302020-08-24T11:38:04+5:30
नागपूर शहरात दररोज एक हजाराच्या आसपास कोविड रुग्ण आढळून येत असून ३० ते ४० लोकांचा मृत्यू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठ-दहा दिवसापासून नागपूर शहरात दररोज एक हजाराच्या आसपास कोविड रुग्ण आढळून येत असून ३० ते ४० लोकांचा मृत्यू होत आहे. लक्षणे आढळून आल्यानंतर लगेच उपचार न घेता त्रास वाढल्यानंतर उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. यामुळे दाखल झाल्यानंतर २४ तासात मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ४८५ मृत्यूपैकी ३०० रुग्णांचा मृत्यू उपचारासाठी दाखल झाल्यानंतर २४ तासात झाला तर ४८ तासात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३८ टक्के आहे. वेळीच उपचार केले असते तर ही संख्या कमी राहिली असती, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना दिली.
११ मार्च ते ३१ मे दरम्यान नागपूर शहरात रिकव्हरी रेट अधिक होता. परंतु जूनपासून परिस्थिती बदलली. ऑगस्ट महिन्यात परिस्थिती गंभीर बनली. याला नागरिकांची बेजबाबदार वागणूक प्रामुख्याने कारणीभूत आहे. लॉकडाउन कुणालाच नको आहे. दुसरीकडे नियमही पाळले जात नाही. बाजारात फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. मास्कचा वापर होत नाही. तंबाखू व खर्रा खणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यांच्या थुंकण्यातून संसर्ग वाढण्याचा अधिक धोका आहे. यासाठी नागरिकांनी अंतर्मुख होण्याची गरज असल्याचे मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले तुकाराम मुंढे
- २२ दिवसात ६२ हजार रुग्णांची तपासणी
- ११ मार्च ते २२ऑगस्ट दरम्यान एक लाखाहून अधिक रुग्णांची तपासणी
- नागपूर शहरात ३४ ठिकाणी कोविड ठिकाणी टेस्टिंग सेंटर
- मृतांमध्ये ८५ टक्के जुने आजार असलेल्यांचा समावेश
- ६० टक्के रुग्ण आजार गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होतात
- ताप, सर्दी व खोकला असल्यास डॉक्टरकडे तपासणी करून घ्या.
-प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून वर्तणूक सुधारावी.
-अॅप डाऊनलोड करून मनपा प्रशासनाची मदत घ्या.