नागपुरात ४४ ‘डिग्री’तही ६० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:22 AM2019-04-12T00:22:11+5:302019-04-12T00:29:19+5:30
उपराजधानीत पारा तापला असतानादेखील लोकसभा निवडणुकांच्या मतदानात मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. ४३.५ अंश सेल्सिअसवर पारा गेला असतानादेखील जवळपास ६० टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ च्या तुलनेत ३ टक्क्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत पारा तापला असतानादेखील लोकसभा निवडणुकांच्या मतदानात मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. ४३.५ अंश सेल्सिअसवर पारा गेला असतानादेखील जवळपास ६० टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ च्या तुलनेत ३ टक्क्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे हे विशेष.
उपराजधानीच्या सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारच्या सुमारास मात्र चढलेल्या पाऱ्याने मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. परंतु एकूणच २०१४ सालच्या तुलनेत सुमारे जवळपास तीन टक्के अधिक मतदान जास्त झाले.
मागील लोकसभा निवडणुकांत नागपुरात जवळपास ५७ टक्के मतदान झाले होते. यंदादेखील अशाच प्रकारचे वातावरण राहते की काय अशी धास्ती होती. परंतु तरुण व नवमतदारांनी दाखविलेल्या विशेष उत्साहामुळे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी होती. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तीपर्यंत अनेकांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावली. सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५६ टक्के तर दुपारी १ वाजेपर्यंत नागपुरात २७.४७ टक्के मतदान झाले होते. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त जाणवत होती.सहाजिकच मतदान केंद्रांवरील वर्दळदेखील कमी होऊ लागली. निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या ‘बूथ’वरील कार्यकर्तेदेखील सावलीकडे सरकले. त्यानंतर दुपारच्या सुमारास ठराविक गतीने मतदान सुरू होते. दुपारी ४ नंतर मात्र परत एकदा मतदानाने वेग घेतला. उन्हाचा मारा कमी झाल्याने गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांची मतदार केंद्रांवर लक्षणीय उपस्थिती होती. सायंकाळी ५ वाजता मतदानाचा आकडा ५३ टक्क्यांवर पोहोचला. यानंतर मतदान केंद्रांवर परत गर्दी होऊ लागली अन् शेवटी मतदानाच्या टक्केवारीने ‘फर्स्टक्लास’ मारलाच.
सोशल मीडियावर सबकुछ ‘व्होटिंग’
प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतरदेखील अनेक नवमतदारांचा अन् तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण गर्वाने दाखवत ‘फोटोसेशन’लादेखील ऊत आला होता अन् लगेच ‘सोशल मीडिया’वर ‘शेअर’ करणेदेखील सुरू होते. ‘मी मतदान केले’, ‘प्लीज, डू व्होट’ अशा पद्धतीच्या ‘मॅसेज’ची देवाणघेवाण सुरू होती.
मतदानाच्या टक्केवारीचा पल्ला
सकाळी ११ वाजता १७.५६%
दुपारी १ वाजता २७.४७
दुपारी ३ वाजता ३८.३५ %
सायंकाळी ५ वाजता ५३.१३ %
सायंकाळी ६ वाजता अंदाजे ६० %