नागपुरात एप्रिलमध्ये ६७२ वेळा बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:42 AM2019-05-18T10:42:54+5:302019-05-18T10:44:31+5:30

शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना तापमानाचे चटके सहन करावे लागत आहेत.

In Nagpur, 672 times power cut in the month of April | नागपुरात एप्रिलमध्ये ६७२ वेळा बत्ती गुल

नागपुरात एप्रिलमध्ये ६७२ वेळा बत्ती गुल

Next
ठळक मुद्देमहिनाभरात सतत ब्रेकडाऊननागरिकांना बसताहेत तापमानाचे चटके

कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना तापमानाचे चटके सहन करावे लागत आहेत. ही समस्या विशेषत: एसएनडीएलच्या क्षेत्रात पहायला मिळत आहे. महावितरणच्या अहवालावरून ही बाब उघडकीस आली आहे.
अहवालानुसार एप्रिलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ३३ केव्ही लाईनचे एकूण ६७२ वेळा म्हणजे, रोज २२.४ वेळा ब्रेकडाऊन झाले. त्यावरून दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत असल्याचे सिद्ध होते कारण, ११ केव्ही व अन्य किरकोळ बिघाडामुळे वीज पुरवठा बंद होण्याच्या आकडेवारीचा यात समावेश नाही. महावितरण ३३ केव्ही लाईनमध्ये झालेल्या ब्रेकडाऊनचा अहवाल दर महिन्यात मुख्यालयाला सादर करते. त्या अहवालामध्ये एसएनडीएल क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या बिघाडाचा समावेश असतो. एसएनडीएल क्षेत्रात अनेक ब्रेकडाऊन झाले आहेत. महावितरण अधिकारी उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असल्यामुळे ब्रेकडाऊन होत असल्याचा दावा करीत आहेत. उन्हाळ्यात वीज उपकरणे लवकर तापतात. ती थंड रहावी याकरिता कुलर लावण्यात आले आहेत. परंतु, बहुतांश उपकरणे मोकळ्या जागेवर असल्याने त्यांना थंड ठेवणे शक्य होत नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसएनडीएलनुसार तापमानासह वीज पुरवठ्यावरचा दबावही वाढला आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी ४११ एमव्हीए विजेच्या मागणीची नोंद झाली होती. यावर्षी या महिन्याच्या दुसºया आठवड्यातच विजेची मागणी ३७५ एमव्हीएपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मागणी लवकरच ४११ एमव्हीएचा उच्चांक ओलांडण्याची शक्यता आहे. मागणी वाढल्यामुळे तांत्रिक बिघाड होत आहेत.
खोदकामही कारणीभूत
वीज कंपन्यांच्या माहितीनुसार, शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग, ओसीडब्ल्यू, मेट्रो आदी संस्था विविध कामांसाठी खोदकाम करीत आहेत. दरम्यान, अनेकदा वीज केबलचे नुकसान होते. त्यामुळे वीजपुरवठा बंद होतो. केबल जोडल्यानंतर तो भाग अधिक दबाव सहन करू शकत नाही. जोड उघडा पडून ब्रेकडाऊन होतो.
दिलासा नाही, आराखडा मात्र तयार
वीजपुरवठा बंद होण्यापासून दिलासा मिळण्याची काहीच आशा नाही. एसएनडीएलमधील सूत्रानुसार, शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज लाईनमध्ये शिरल्या आहेत. केवळ बुधवारी वीजपुरवठा बंद करून त्या फांद्या तोडणे अशक्य आहे. त्यामुळे रोज सकाळी वीजपुरवठा बंद करून फांद्या तोडण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी ४५ दिवसात ९३ वर ब्रेकडाऊन झाल्याचे स्वीकारले आहे. तसेच, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडा तयार असल्याचा दावा केला आहे. विकासकामे करताना केबल तोडण्यात आल्यामुळे २५ वर ब्रेकडाऊन झाल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.
सकाळी मेडिकल, सायंकाळी महालचे हाल
मेडिकल फिडर अंतर्गतच्या परिसरात शुक्रवारी बरेच तास वीज बंद होती. एसएनडीएलच्या माहितीनुसार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरातील झाडे कापण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. तसेच, दाब दुसºया फिडरवर स्थानांतरित केल्यामुळे वीजपुरवठा प्रभावित झाला. सायंकाळी महाल परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा बंद पडला. याशिवाय मनीषनगर येथील बाळकृष्ण कंदिले यांच्या घरचा वीजपुरवठा रात्री बंद होता. वारंवार तक्रार करूनही त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही.

Web Title: In Nagpur, 672 times power cut in the month of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज