नागपुरात बाधितांपेक्षा ७५ टक्के अधिक रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:13 AM2021-05-05T04:13:38+5:302021-05-05T04:13:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काही दिवसांपासून कोरोनाची दाहकता झेलणाऱ्या नागपूर जिल्ह्याला मंगळवारी मोठा दिलासा मिळाला. नव्या बाधितांपेक्षा ७५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही दिवसांपासून कोरोनाची दाहकता झेलणाऱ्या नागपूर जिल्ह्याला मंगळवारी मोठा दिलासा मिळाला. नव्या बाधितांपेक्षा ७५ टक्क्यांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. शिवाय बऱ्याच दिवसांनंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सव्वाचार हजारांहून कमी नोंदविली गेली.
मंगळवारी नागपूर जिल्ह्यात ४ हजार १८२ रुग्ण आढळले. यांतील २ हजार ४९८ रुग्ण नागपूर शहरातील, तर १ हजार ६७४ रुग्ण ग्रामीण भागातील होते. या तुलनेत ठीक होणाऱ्यांची संख्या तीन हजारांहून अधिक होती. २४ तासांत ७ हजार ३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यांतील ४ हजार ९१५ रुग्ण शहरातील, तर २ हजार ४३४ रुग्ण ग्रामीण भागातील होते. मंगळवारी ७१ मृत्यूंची नोंद झाली. यात शहरातील ४०, ग्रामीणमधील २१, तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश होता.
सक्रिय रुग्णसंख्या ७० हजारांखाली
मंगळवारी सक्रिय रुग्णसंख्यादेखील ७० हजारांखाली आली. जिल्ह्यात एकूण ६९ हजार १९९ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ३८ हजार ८८४ रुग्ण शहरातील, तर ३० हजार ३१५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ५६ हजार ५०१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत; तर विविध रुग्णालयांमध्ये १२ हजार ६९८ रुग्ण दाखल आहेत.
१९ हजारांहून अधिक चाचण्या
२४ तासांत १९ हजार ४६८ नमुन्यांची तपासणी झाली. यात शहरातील १३ हजार ७७२, तर ग्रामीणमधील ५ हजार ६९६ नमुन्यांचा समावेश होता. आतापर्यंत जिल्ह्यात २३ लाख ५७ हजार ४४९ नमुन्यांची तपासणी झाली आहे.
मे महिन्यातील संसर्ग
दिनांक – नवे बाधित – मृत्यू – ठीक
१ मे – ६,५६७ – ९९ – ७,५७५
२ मे – ५,००७ – ११२ – ६,३७६
३ मे – ४,९८७ – ७६ – ६,६०१
४ मे – ४,१८२ – ७१ – ७,३४९