नागपूर ७.६, गाेंदिया ७.४ अंश; ३ फेब्रुवारीला सायक्लाेनिक सर्क्युलेशनची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 08:42 PM2022-01-29T20:42:10+5:302022-01-29T20:42:42+5:30
Nagpur News नागपुरात शनिवारी ७.६ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. ७.४ अंशासह गाेंदिया सर्वाधिक गारठला हाेता.
नागपूर : मागील तीन दिवसांपासून विदर्भात तापमानामध्ये घसरण सुरू आहे. २४ तासात बहुतेक जिल्ह्यातील तापमान पुन्हा घसरले. नागपुरात शनिवारी ७.६ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. ७.४ अंशासह गाेंदिया सर्वाधिक गारठला हाेता. रविवारपासून काही दिवस थंडीपासून दिलासा मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा ५.५ ते ६.५ अंशापर्यंत घसरले असल्याने थंडीचा तडाखा अधिकच तीव्र झाला आहे. नागपुरात सरासरीपेक्षा ६.५ अंश कमी किमान तापमानाची तर गाेंदियात ६.९ अंश कमी किमान तापमानाची नाेंद झाली. वर्धा ५.५ अंशाच्या घसरणीसह ८.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. गडचिराेलीतही हुडहुडी वाढली आहे. येथे ८.६ अंश किमान तापमान नाेंदविले गेले. त्यानंतर अकाेला व ब्रह्मपुरी ९.१ अंश, बुलडाणा ९.२ अंश, चंद्रपूर ९.४ अंश, अमरावती १०.२ अंश व यवतमाळ येथे १०.४ अंश किमान तापमान नाेंदविण्यात आले.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३० जानेवारीला वातावरण बदलणार असून त्यानंतर तापमानात ३ ते ४ अंशाची वाढ हाेण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारीपर्यंत वातावरण काेरडे व काही भागात आकाश आंशिक ढगाळ राहील. ३ फेब्रुवारीला राजस्थान व आसपासच्या क्षेत्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार हाेण्याची शक्यता असून त्यामुळे पुन्हा वातावरणात बदल हाेईल, असा अंदाज आहे.