नागपूर @ ७.८; यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 07:19 PM2021-12-20T19:19:19+5:302021-12-20T19:20:46+5:30
Nagpur News सोमवारी सकाळी नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार किमान ७.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. राज्यातील सर्वात कमी तापमान नागपुरातच होते.
नागपूर : मागील तीन ते चार दिवसांपासून नागपुरात सातत्याने पारा घसरत असून, सोमवारी सकाळी यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार किमान ७.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. राज्यातील सर्वात कमी तापमान नागपुरातच होते. पुढील दोन दिवसात हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोमवारी पहाटेच्यासुमारास सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. रविवारी सायंकाळपासूनच गारठा वाढला होता. सोमवारी किमान ७.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. २४ तासांत पारा ५.६ अंशांनी घसरला. शिवाय सरासरीहून किमान तापमान ४.७ अंशांनी कमी होते. कमाल तापमानातदेखील घट झाली व २४.८ अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, भारतात उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. हवेचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिण दिशेला आला की, वातावरण काेरडे हाेईल आणि तापमानात घसरण नाेंदविली जाईल
चार जिल्ह्यांत पारा १० अंशांहून खाली
विदर्भातील चार जिल्ह्यांत पारा १० अंश सेल्सिअसहून खाली गेला. यात नागपूरसह अमरावती (८ अंश सेल्सिअस), गोंदिया (८.२ अंश सेल्सिअस) व वर्धा (९ अंश सेल्सिअस) यांचा समावेश होता. पुढच्या दाेन दिवसांत कडाक्याची थंडी जाणवणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
नागपूर, विदर्भात थंडीचीच लाट
दरम्यान, हवामान खात्यानेदेखील तापमानाबाबत इशारा जारी केला आहे. अमरावती व नागपुरात दोन दिवस थंडीची लाट असेल व किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली आहे.
जिल्हा : किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला : ११.३
अमरावती : ८.०
बुलडाणा : १०.५
चंद्रपूर : ११.४
गडचिरोली : ११.६
गोंदिया : ८.२
नागपूर : ७.८
वर्धा : ९.०
यवतमाळ : १२.५