नागपूर; ज्ञानमय प्रकाशाच्या वाटचालीची नव्वदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:58 PM2018-08-23T13:58:41+5:302018-08-23T14:02:15+5:30
१९ आॅगस्ट १९२८ साली धंतोली परिसरात मध्यभारतात अंधांसाठी पहिली शाळा सुरू केली. अंधाच्या सेवेत व्रतस्थ असलेल्या संस्थेने आज नव्वदी गाठली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात अंधत्व येणे म्हणजे शापच. निरक्षरता, अशिक्षितपणामुळे अशा व्यक्तींना कुटुंबसुद्धा वाळीत टाकायचे किंबहुना त्याला आयुष्यातूनच संपविण्याचा प्रयत्न कुटुंबातूनच व्हायचे. अशीच एक घटना रावसाहेब वाडेगावकर यांच्या निदर्शनास आली. मुलगा अंध आहे म्हणून त्याची आई त्याला विष देऊन संपविण्याचा प्रयत्न करीत होती. आईचा हा प्रयत्न रावसाहेबांनी हाणून पाडला. मात्र अंधाच्या वेदनेची खदखद त्यांच्या मनात सल करून गेली आणि अंध रावसाहेबांनी मनाशी खूणगाठ बांधून १९२८ मध्ये अंधांच्या प्रगतीसाठी दरवाजे उघडले केले. दि ब्लार्इंड रिलीफ असोसिएशनची स्थापना करून १९ आॅगस्ट १९२८ साली धंतोली परिसरात मध्यभारतात अंधांसाठी पहिली शाळा सुरू केली. अंधाच्या सेवेत व्रतस्थ असलेल्या संस्थेने आज नव्वदी गाठली आहे. येत्या २५ आॅगस्ट रोजी संस्था आपला ‘ नवम दशकपूर्ती स्थापना दिवस’ साजरा करणार आहे.
संस्थेचे संस्थापक रावसाहेब वाडेगावकर हे स्वत: अंध असूनही प्रचंड ध्येयवादी होते. केवळ दृष्टी नाही म्हणून अंधांनी शिकू नये, प्रगती करू नये, सन्मानाने जगू नये हे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच त्यांंनी दृष्टिबाधितांना शिकवून त्यांना पायावर उभे करण्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी पहिल्या अंध विद्यालयाचे बीजारोपण केले. त्याकाळी अंध मुले गोळा करणे, शाळा चालविणे हे कसबच होते. रावसाहेब हे स्वत: शाळेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अंध मुलांना हातगाडीवर बसवून भजन म्हणत शहरभर फिरून निधी गोळा करायचे. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी व प्रज्ञाभारतीचे श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी वाडेगावकरांना त्यासाठी मदत केली. १९३५ मध्ये अंध विद्यालय दक्षिण अंबाझरी मार्गावर स्थानांतरीत झाले. रावसाहेबांनी त्यांच्या निधनापर्यंत आपल्या रक्ताचा कण न कण या विद्यालयासाठी वेचला. त्याकाळी लावलेले हे रोपटे आज अंधांच्या जीवनात वटवृक्षाची भूमिका बजावत आहे.
येथे येणारे विद्यार्थी हे समाजाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येतात. त्यांच्यावर संस्कार करून त्यांचा आत्मविश्वास वाढवून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे मोठे कार्य विद्यालयाच्या माध्यमातून घडत आहे. संस्थेने अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या निवासासाठी वसतिगृहाची स्थापना केली आहे.
अंध विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दैनंदिन वापराच्या वस्तू, शालेय साहित्य, जेवणाची सोय नि:शुल्क केली आहे. संस्थेने अंधांसाठी निव्वळ ज्ञानाचे दरवाजे उघडे केले नसून, कर्मशाळेच्या माध्यमातून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे.
संस्थेच्या या ९० वर्षाच्या प्रवासात आत्मविश्वास गमविलेल्या हजारो अंध विद्यार्थ्यांनी प्रगतीच्या वाटा सुकर केल्या आहेत.
तंत्रज्ञानातून शोधल्या विकासाच्या पायवाटा
अंधांना ज्ञानाचा मार्ग दाखविणारी ब्रेललिपी. ब्रेललिपीचे प्रिंटर केंद्र सरकारच्या मदतीने संस्थेला प्राप्त झाले. संस्थेने तज्ज्ञ दिव्यांगाच्या मदतीने ब्रेलमध्ये पुस्तके निर्माण केली. दृष्टिबाधितांच्या मागणीप्रमाणे पुस्तके निर्माण करण्याचे कार्य संस्था करीत आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक आॅडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ उभारण्यात आला आहे. येथे विविध अभ्यासक्रमाचे तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम रेकॉर्डिंग होत आहे. संस्थेने आधुनिक दर्जाच्या नेत्र चिकित्सालयासाठी माधव नेत्रालयाला दीर्घ मुदतीसाठी जागा लीजवर दिली आहे.
संस्थेच्या प्रगतीला यांचा लागला हातभार
रावसाहेब वाडेगावकर यांनी साकारलेल्या रोपट्याला वटवृक्ष बनविण्यासाठी या नऊ दशकात रावसाहेब बंबावाले, बी.सी. पारेख, के.टी. मंगळमूर्ती, बी.जी. घाटे, के.बी. मादन, पी. आर. मुंडले, पी.आर. कुळकर्णी यांचा हातभार लाभला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक राज्यपालांनी विद्यालयाला भेट दिली आहे. कस्तुरबा गांधी, गानकोकिळा लता मंगेशकर, अमेरिकन फाऊंडेशन फॉर ब्लार्इंडच्या हेलन केलर, पंजाबराव देशमुख यांनी अंध विद्यालयाला भेट दिली आहे. सध्या या संस्थेचा कारभार अध्यक्ष निखिल मुंडले, सचिव नागेश कानगे यांच्या नेतृत्वात विनय बखले, विश्वास बक्षी, संदीप धर्माधिकारी, मीनाक्षी ठोंबरे, मकरंद पांढरीपांडे, प्रशांतकुमार बॅनर्जी, विघ्नेश पाध्ये, वंदना वर्णेकर, अश्विन कोठारी, अतुल मोहरीर, गजानन रानडे, अनिता शिरपूरकर यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
वाडेगावकरांनी रचलेला पाया इतका मजबूत आहे की, संस्थेच्या ९० वर्षाच्या प्रवासातही दृष्टिबाधितांच्या हिताशी व्रतस्थ आहे. दृष्टिबाधितांची सेवा हा उद्देश ठेवून आहे त्या संसाधनाचा उपयोग करून जास्तीत जास्त अंध बांधवांना जीवनाचा मार्ग सुकर करून द्यायचा आहे.
- निखिल मुंडले,
अध्यक्ष, दि. ब्लार्इंड रिलिफ असो.