Nagpur: मेडिकलमधील बनावट टॅब्लेट प्रकरणात चार कंपन्यांच्या मालक-संचालकांविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Published: October 3, 2024 09:42 PM2024-10-03T21:42:56+5:302024-10-03T21:43:24+5:30

Nagpur News: मेडिकलमध्ये ‘रिक्लॅव्ह ६२५’ ही अॅण्टीबायोटिक औषधी बनावट असल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीची चार कंपन्यांची साखळी असल्याची बाब समोर आली आहे.

Nagpur: A case has been registered against the owner-directors of four companies in the fake medical tablets case | Nagpur: मेडिकलमधील बनावट टॅब्लेट प्रकरणात चार कंपन्यांच्या मालक-संचालकांविरोधात गुन्हा दाखल

Nagpur: मेडिकलमधील बनावट टॅब्लेट प्रकरणात चार कंपन्यांच्या मालक-संचालकांविरोधात गुन्हा दाखल

- योगेश पांडे  
नागपूर - मेडिकलमध्ये ‘रिक्लॅव्ह ६२५’ ही अॅण्टीबायोटिक औषधी बनावट असल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीची चार कंपन्यांची साखळी असल्याची बाब समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्यात अखेर चारही कंपनीचे मालक व संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘लोकमत’नेच सर्वात अगोदर हे प्रकरण उघडकीस आणले होते हे विशेष.

या प्रकरणात पोलिसांनी कोल्हापूरमधील विशाल एन्टरप्रायझेसचा सुरेश दत्तात्रय पाटील, गुजरातमधील सूरत येथील फार्मासिक्स बायोटेकची मालक प्रिती सुमित त्रिवेदी, भिवंडीतील ॲक्वेंटीस बायोटेकचा मालक मिहीर त्रिवेदी, मिरा रोड, ठाणे येथील काबिज जेनेरिक हाऊसचा मालक विजय शैलेंद्र चौधरी व एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या ‘एफडीए’ने नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या औषधी भांंडारातील बनावट औषधीचा पर्दाफाश केला. अॅण्टीबायोटिक असलेली ‘रेसीफ-५००’ नावाचा औषधीत 'सिप्रोफ्लोक्सासिन'नावाची औषधीच नसल्याचे तपासणीत आढळून आले. गुजरात येथील ‘रिफायंड फार्मा’ नावाच्या या कंपनीचे हे औषध असले तरी ही कंपनी अस्तित्वातच नसल्याची बाब चौकशीतून समोर आले. या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी याच महिन्यात सहा जणांना अटक केली होती. हे प्रकरण ताजे असताना ‘एफडीए’च्या तपासणीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधी भांडारातून ‘रिक्लॅव्ह ६२५’ या अॅण्टीबायोटिक औषधी बनावट निघाल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे औषधी निरीक्षक नितीन भांडारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २७६, ३४, ४२०, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अशी होती पुरवठा साखळी
या प्रकरणात काबिज जेनेरिक हाऊसकडून बाजारातून हे बनावट औषध खरेदी करण्यात आले होते. त्यांनी जुलै महिन्यातच ॲक्वेंटीस बायोटेकला विक्री केली. तर ॲक्वेंटीसने ही औषधे फार्मासिक्स बायोटेकला विकली. फार्मासिक्स बायोटेककडून कोल्हापुरमधील विशाल एन्टरप्रायझेसने औषधे खरेदी केली होती. त्याच औषधांचा मेडिकलमध्ये पुरवठा करण्यात आला.

दोन आरोपी अगोदरपासूनच अटकेत
या रॅकेटमधील मिहीर त्रिवेदी व विजय शैलेंद्र चौधरी या आरोपींना अगोदरपासूनच अटक करण्यात आली आहे. चौधरीविरोधात कळमेश्वरसोबतच भिवंडी, नांदेड व वर्धा येथेदेखील गुन्हे दाखल आहेत. तर त्रिवेदीदेखील त्याच प्रकरणात आरोपी होता व त्यालादेखील पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींची नागपूर पोलिसांकडून लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Nagpur: A case has been registered against the owner-directors of four companies in the fake medical tablets case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.