नागपुरात महाजेनकोच्या लाचखोर सुरक्षा अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:07 AM2019-02-07T01:07:37+5:302019-02-07T01:09:10+5:30
अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी)कारवाई करीत कोराडी येथील वीज केंद्राचा सुरक्षा अधिकाऱ्यास लाच घेतांना पकडले. या कारवाईमुळे महाजेनको हादरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी)कारवाई करीत कोराडी येथील वीज केंद्राचा सुरक्षा अधिकाऱ्यास लाच घेतांना पकडले. या कारवाईमुळे महाजेनको हादरले आहे.
बालाकृष्ण कालिदास कुळकर्णी (४०) असे आरोपीचे नाव आहे. तो कोराडी वीज केंद्रात उपवरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा) आहे. तक्रारकर्ता टॅक्सी कॉँट्रॅक्टर आहे. तक्रारकर्त्याने २१ मे २०१८ रोजी त्याची कार कोराडी वीज केंद्रातील सुरक्षा विभागात भाड्याने लावली होती. कारचे ऑक्टोबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे बील थकीत होते. चार बील सादर करण्यासाठी तक्रारकर्त्याने के.एम. पाटील यांच्या नावाने आॅनलाईन अर्ज केला होता.
कुलकर्णीने प्रत्येक बिलामागे २ हजार रुपये असे एकूण ८ हजार रुपयाची लाच मागितली. लाच न दिल्यास बील मंजूर होणार नाही, अशी धमकी दिली. लाच देण्याची इच्छा नसल्याने कॉन्ट्रॅक्टरने एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पुष्टी होताच एसीबीने बुधवरी दुपारी कुलकर्णीला पकडण्याची योजना आखली. चर्चेदरम्यान कुलकर्णी पाच हजार रुपये घेण्यासाठी तयार झाला. एसीबीने त्याला पाच हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. यानंतर कुलकर्णीचे घर आणि कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत एसीबीचा तपास सुरु होता.
कुलकर्णीच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अमनेक दिवसानंतर एसीबीने महाजेनकोमध्ये कारवाई केली. ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उप अधीक्षक शंकर शलके, कर्मचारी प्रवीण पडोळे, मंगेश कळंबे, प्रभाकर बेले आणि परसराम साही यांनी केली.