Nagpur: ‘हिट ॲंड रन’ प्रकरणात २२ दिवसांनी आरोपी ताब्यात, मात्र नोटीस देऊन सुटका, पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप

By योगेश पांडे | Published: May 30, 2024 09:48 PM2024-05-30T21:48:46+5:302024-05-30T21:50:25+5:30

Nagpur News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ दिवसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याच्यावर दाखल कलमे लक्षात घेता केवळ नोटीस देऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या एका चुकीमुळे महिलेला मरणयातना भोगाव्या लागत असून बसणेदेखील कठीण झाले आहे.

Nagpur: Accused detained after 22 days in 'hit and run' case, but released with notice, anger against police role | Nagpur: ‘हिट ॲंड रन’ प्रकरणात २२ दिवसांनी आरोपी ताब्यात, मात्र नोटीस देऊन सुटका, पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप

Nagpur: ‘हिट ॲंड रन’ प्रकरणात २२ दिवसांनी आरोपी ताब्यात, मात्र नोटीस देऊन सुटका, पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप

- योगेश पांडे 
नागपूर - मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ दिवसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याच्यावर दाखल कलमे लक्षात घेता केवळ नोटीस देऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या एका चुकीमुळे महिलेला मरणयातना भोगाव्या लागत असून बसणेदेखील कठीण झाले आहे. मात्र कायद्याचा आधार घेत आरोपी मात्र मोकाट बाहेर पडला आहे. या प्रकरणात पोलिसांची सुरुवातीपासूनची भूमिका संशयास्पद होती व आता या प्रकारामुळे तर आणखी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

७ मे २०२४ ला सकाळी ७ च्या दरम्यान गिट्टीखदानमधील ममता संजय आदमने (वय ४५) आणि वंदना अजय पाटील या दोघींना शिवाजी चौकात एका पांढऱ्या रंगाच्या कारने चिरडले होते. सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला होता. या अपघातानंतर आदमने यांची प्रकृती खालावली असून त्यांना पलंगावरून उठणेदेखील शक्य नाही. त्यांच्या कुटुंबावर यामुळे मोठा आर्थिक ताण पडला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जखमींच्या बयाणाच्या आधारावर भादंविच्या कलम २७९, ३३७ तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १३४, १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये आरोपीच्या कारचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याचे सांगत हात झटकणे सुरू केले. अखेर सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ सक्रिय झाले व आरोपी कारचालकाला शोधण्यासाठी पावले उचलण्यात आली. तपासानंतर पोलिसांनी कमलेश नावाच्या कॅबचालकाला ताब्यात घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या चुकीमुळे एक महिला मरणयातना भोगत असताना त्याला केवळ नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तर त्याची कार जप्त करण्यात आली. अपघात प्रकरणातील कलमांनुसार त्याला सोडण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र गुन्हा दाखल करतानाच कठोर कलमं का लावण्यात आली नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सोशल माध्यमांमुळे आली पोलिसांना जाग?
या प्रकरणात पोलीस अगोदर हात झटकत होते व सीसीटीव्हीत कारचा क्रमांक दिसत नसल्याचा दावा करत होते. मात्र हे प्रकरण सोशल माध्यमांमध्ये येताच पोलिसांना जाग आली व दोन दिवसांत आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पोलिसांची सुरुवातीची भूमिका प्रामाणिक होती की आता दबाव निर्माण झाल्यामुळे पावले उचलण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Nagpur: Accused detained after 22 days in 'hit and run' case, but released with notice, anger against police role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.