नागपूर मनपाचा उन्हाळ्यासाठी ‘हिट अॅक्शन प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:50 AM2018-03-27T10:50:40+5:302018-03-27T10:50:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.
यानुसार दुपारी १ ते ४ या उन्हाच्या वेळात काम करणाऱ्या कामगारांचे काम बंद करावे, त्यांना सावलीत विश्रांती द्यावी, अशा सूचना सर्व विभागाला महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. कामगारांना उन्हात विश्रांतीसाठी शहरातील सर्व उद्याने खुले करण्यात आली आहेत. तसेच नागपुरातील प्रमुख चौकांमध्ये पाणपोईची सोय करण्यात आली आहे.
नागपूरसह विदर्भात उन्हाळ्यातील तापमान ४४-४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत वाढलेल्या तापमानामुळे लोकांच्या आरोग्याच्याही समस्या निर्माण होतात. दुपारच्या उन्हात घराबाहेर पडणे अशक्य होते. पण कामगारांना पोट भरण्यासाठी काम करायला घराबाहेर पडावेच लागते. अकुशल कामगारांना तर उन्हातच काम करावे लागत असल्याने त्यांना उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. दरवर्षी हजारो नागरिकांना उष्माघातामुळे आजारी पडावे लागते. अनेकदा यात मृत्यू होण्याची शक्यता असते.
मागील काही वर्षांत उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात हिट अॅक्शन प्लॅन लागू केला. यानुसार शक्यतो दुपारी १ ते ४ या वेळेत काम करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच शहराच्या सर्व प्रमुख ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मोठ्या मॉल्समध्ये एक शीतखोली तयार केली जाणार आहे. शहरातील सर्व गार्डन दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास त्याच्यावर उपचारासाठी १०८ या क्रमांकाच्या दूरध्वनीवर त्वरित अॅम्बुलन्स उपलब्ध होईल, अशा २५ अॅम्बुलन्स सज्ज राहणार आहते. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये शीत वॉर्ड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शाळा सकाळी भरणार
वाढत्या उन्हाचा प्रभाव बघता दुपारच्या सत्रातील शाळा सकाळच्या सत्रात घेतल्या जाणार आहे. नागरिकांनी उष्माघातापासून कसा बचाव करावा, हे सांगण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहते. उन्हाळा अनेकदा जीवावर बेतण्याची भीती असते. त्यामुळे महापालिकेच्या या हिट अॅक्शन प्लॅनचा उपयोग नागरिकांना होणार आहे.