नागपुरात पत्नीची हत्या करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:23 PM2018-09-04T22:23:25+5:302018-09-04T22:26:26+5:30
दारुड्या नवरोबाने त्याच्या पत्नीला लाकडी दांड्याने जबर मारहाण करून तिची हत्या केली. हे पाप चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आरोपीने तिचा मृतदेह पोत्यात भरून सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत टाकला. शौचालयाचे पाणी बंद झाल्यामुळे दुरुस्तीसाठी प्लंबर त्या ठिकाणी गेला. त्यामुळे तीन दिवसांनंतर हा गुन्हा उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारुड्या नवरोबाने त्याच्या पत्नीला लाकडी दांड्याने जबर मारहाण करून तिची हत्या केली. हे पाप चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आरोपीने तिचा मृतदेह पोत्यात भरून सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत टाकला. शौचालयाचे पाणी बंद झाल्यामुळे दुरुस्तीसाठी प्लंबर त्या ठिकाणी गेला. त्यामुळे तीन दिवसांनंतर हा गुन्हा उघडकीस आला.
चंद्रकला राज यादव (वय ३८) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर, तिची हत्या करणाऱ्या दारुड्या पतीचे नाव राज यादव (वय ४०) आहे. तो मूळचा मध्यप्रदेशातील कटनी येथील रहिवासी होय. १५ वर्षांपूर्वी तो महाराष्ट्रात आला. पाटणसावंगीच्या बाजार चौकात राहत असताना त्याचे चंद्रकलासोबत तीन वर्षांपूर्वी सूत जुळले. त्यानंतर तो चंद्रकलाला घेऊन दीड वर्षांपूर्वी धरमपेठेतील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कजवळच्या सुलभ शौचालयात आला. तो आणि चंद्रकला तेथेच राहत होती. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. योग्य औषधोपचार न झाल्यामुळे ती फारच अशक्त बनली होती. ती दिवसभर राजसोबतच राहत होती. राज २४ तास नशेत राहत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री तो दारूच्या नशेत टून्न होता. त्याचे चंद्रकलासोबत भांडण झाले. त्याने लाकडी दांड्याने चंद्रकलाला बेदम मारहाण केली. डोक्यावर फटके पडल्याने ती रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडत राहिली. पहाटेच्या वेळी तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यामुळे आरोपी राज यादवने तिचा मृतदेह पोत्यात भरला. ते पोते शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत फेकले. दरम्यान, पोत्याचा काही भाग टाक्याच्या पाईपलाईनच्या छिद्रात शिरल्याने शौचालयाचे पाणी बंद झाले. त्यामुळे गजानन निरपेंद्र प्रसाद नामक व्यक्ती प्लंबरला घेऊन तेथे पोहचले.
त्यांनी पाण्याच्या टाकीचे झाकण उघडून आत डोकावले असता तीव्र दुर्गंध आला. तेथे एक पोते पडून दिसल्याने त्यांनी शौचालयाची देखरेख करणारांना तसेच सीताबर्डी पोलिसांना कळविले. ठाणेदार हेमंत खराबे आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. पोते बाहेर काढल्यानंतर त्यात महिलेचा मृतदेह आढळला. ही माहिती कळताच तेथे बघ्यांची मोठी गर्दी उसळली. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र बोरावके, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, सीताबर्डी पोलिसांनी गजानन निरपेंद्र प्रसाद (वय ३२) यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला.
तो तीन दिवस-रात्र तेथेच होता
पोलिसांनी तेथेच दारूच्या नशेत टून्न असलेल्या आरोपी राजला विचारणा केली. प्रारंभी आपल्याला त्याबाबत काहीच माहिती नसल्याचे तो म्हणाला. नंतर त्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यामुळे तिचा मृतदेह पाण्याच्या टाक्यात फेकल्याचे त्याने सांगितले. त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणल्याच्या दोन तासानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी राज यादव क्रूर वृत्तीचा आहे. हत्या केल्यानंतर तब्बल तीन दिवस तो तेथेच रात्रंदिवस राहत होता. काहीच झाले नाही अशा अविर्भावात तो वावरत होता. त्याला अटक केल्यानंतरही केलेल्या गुन्ह्याचा त्याला पश्चाताप वाटत नव्हता.
आज उघडकीस आलेली १० दिवसांतील हत्येची ही पाचवी घटना होय. २५ आॅगस्टच्या रात्री अरमान अंसारी नामक तरुणाची पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या झाली. त्याच रात्री कुख्यात गुन्हेगार अमित रामटेकेची हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या झाली. ३१ आॅगस्टला दुपारी अजनीतील सम्राट अशोक उद्यानात प्रतिक संजय ढेंगरेची तर ३ सप्टेंबरला दुपारी प्रतापनगरात पप्पू वंजारीची हत्या झाली. आता चंद्रकलाच्या हत्येचा गुन्हा उजेडात आला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी गुन्हेगारी उफाळण्यापूर्वीच त्याची दखल घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया जणमाणसातून उमटली आहे.