नागपुरात व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून केला बसच्या तिकिटांचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:26 AM2018-11-29T00:26:56+5:302018-11-29T00:28:04+5:30
‘आपली बस’चे चालक व वाहकांनी ग्रुप तयार करून तिकिटांचा घोटाळा केल्याची माहिती मनपा परिवहन समितीने केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. चालक आणि वाहकांकडून जप्त केलेल्या १२ मोबाईलमधील ग्रुपमध्ये कुकडे, जगताप आणि डिम्ट्स अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आपली बस’चे चालक व वाहकांनी ग्रुप तयार करून तिकिटांचा घोटाळा केल्याची माहिती मनपा परिवहन समितीने केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. चालक आणि वाहकांकडून जप्त केलेल्या १२ मोबाईलमधील ग्रुपमध्ये कुकडे, जगताप आणि डिम्ट्स अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती मिळाली आहे.
‘आपली बस’ने प्रवास करणाऱ्यांच्या तिकिटांचे पैसे स्वत:च्या खिशात टाकणारे बसचालक, वाहक आणि तपासनीकांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न मनपा परिवहन समिती करीत आहे. परिवहन समितीने नियुक्त केलेल्या तपासणी चमूने शहरातील वेगवेगळ्या मार्गावरील बसेसची तपासणी सुरू करून चालक व वाहकांचे १२ मोबाईल जप्त केले. मोबाईलमधून अनेक आश्चर्यजनक माहिती पुढे आली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या लोकेशनची माहिती तिकिटांचे पैसे हडप करणाऱ्या टोळीला आहे. परिवहन समितीने संबंधित प्रकरणाची पोलिसाच्या सायबर सेलकडे तक्रार केली आहे. सोबतच दोषींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याची तयारी सुरू आहे.
प्रचंड तोट्यातील मनपा परिवहन विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी प्रयत्नरत आहेत. बसमधील प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकिट न देण्याचे प्रकरण उजेडात आले आहेत. वाहकांना निलंबित केल्यानंतरही स्थिती सुधारली नाही. अशा स्थितीत परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी तिकिटांचा घोटाळा उजेडात आणण्यासाठी नवीन योजना तयार केली. त्याअंतर्गत आकस्मिक तपासणी करून चालक व वाहकांकडील मोबाईल जप्त करण्यास सुुरुवात केली. त्याची जबाबदारी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी तपासणी चमू तयार करून गेल्या दोन दिवसांत १२ मोबाईल जप्त केले. जप्त मोबाईलमध्ये जवळपास एक डझन व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून रॅकेटवर नियंत्रण ठेवण्यात येत होते. शिवाय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती लाईव्ह मिळाल्यावर समिती सतर्क झाली आहे. तिकिटांचे पैसे हडप करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपचा फायदा घेतला आहे.
पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद करणार : कुकडे
परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले की, तिकिटांचे पैसे हडप करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. तपासनीस कारोकरला निलंबित केले आहे. या ग्रुपला भारतीय कामगार सेनेचे अंबादास शेंडे यांच्यातर्फे संचालित करण्यात येत आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे लोकेशनची लाईव्ह माहिती ग्रुपवर असणे गंभीर बाब आहे. या प्रकरणात टोळीचा पत्ता शोधण्यात येईल. सायबर सेलकडे तक्रार केली आहे. दोषींच्या विरोधात पोलिसांत प्रकरणांची नोंद करणार आहे.
चालक, वाहकाला बसमध्ये मोबाईल नेण्यावर बंदी
चालक आणि वाहकाला बसमध्ये मोबाईल नेण्यावर बंदी आहे. हा नियम १३ एप्रिल २०१८ पासून ‘आपली बस’मध्ये लागू आहे. त्यानंतरही मोबाईलचा उपयोग चालक व वाहक सर्रास करीत आहेत. दिवाळीनंतर बसमध्ये मोबाईलच्या उपयोगावर पूर्णत: बंदी असल्याचे समितीने सांगितले होते. यासंदर्भात १६ नोव्हेंबरला पत्र जारी केले होते. मोबाईल असल्यास वाहकाला तिकीट मशीन देण्यात येत नव्हती. त्यामुळे ते मोबाईल लपवून ठेवीत होते. मशीन मिळाल्यानंतर चालक व वाहक मोबाईलचा उपयोग करीत असल्याचे दिसून आले आहे.