नागपुरात सहा महिन्यात तिघांचे रहस्यमय खून करणारा अखेर गवसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:02 PM2017-11-18T23:02:00+5:302017-11-18T23:11:11+5:30

सहा महिन्यात एका पाठोपाठ तिघांची निर्घृण हत्या करून बिनबोभाट दुसरे गुन्हे करीत फिरणाऱ्या  एका नराधमाच्या लकडगंज पोलिसांनी अखेर मुसक्या बांधल्या.

In Nagpur, after six months mysterious murderer arrested | नागपुरात सहा महिन्यात तिघांचे रहस्यमय खून करणारा अखेर गवसला

नागपुरात सहा महिन्यात तिघांचे रहस्यमय खून करणारा अखेर गवसला

Next
ठळक मुद्देकुख्यात गुंड छल्ला चौधरीने दिली खुनाची कबुलीलकडगंज पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : सहा महिन्यात एका पाठोपाठ तिघांची निर्घृण हत्या करून बिनबोभाट दुसरे गुन्हे करीत फिरणाऱ्या  एका नराधमाच्या लकडगंज पोलिसांनी अखेर मुसक्या बांधल्या. दुर्गेश ऊर्फ छल्ला धु्रपसिंग चौधरी (वय २८) असे त्याचे नाव असून तो पारडी, कळमन्यातील रहिवासी आहे. तीन आठवड्यांपूर्वी इतवारी रेल्वे स्थानकाजवळच्या झाडाझुडपात आढळलेल्या एका अनोळखी मुलाच्या हत्याकांडातून या कुख्यात आरोपीचा पोलिसांनी छडा लावला.
२६ आॅक्टोबरला हे निर्घृण हत्याकांड उघडकीस आले होते. मृताचे डोके शरीरापासून वेगळे करण्यात आल्यामुळे आणि ते पुरते कुजल्यामुळे मृत कोण, ते स्पष्ट होत नव्हते. कोणताही पुरावा नसताना लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने वेगवेगळ्या पद्धतीने मृताची ओळख पटविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वी नंदनवनमधील देशपांडे लेआऊटमध्ये राहणारा मो. अरमान मो. आलेसरवर (वय १५) हा मुलगा २३ आॅक्टोबरपासून बेपत्ता असल्याची माहिती लकडगंज पोलिसांना कळाली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवून मृताचे कपडे, चप्पल दाखविली. अरमानच्या आई-वडलांनी ती आपल्याच मुलाची असल्याचे सांगितले. पोलिसांनी दफनविधीआधी अरमानचे डीएनए करून घेतले होते. त्याच्या आई-वडिलांचेही डीएनए करण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह अरमानचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृताची ओळख पटल्यामुळे पोलिसांनी पुढच्या तपासाला वेग दिला.
सीसीटीव्हीतून मिळाला धागा
पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता अरमानसोबत घटनेच्या काही वेळेपूर्वी दुसरा एक तरुण जात असल्याचे दिसले. त्या दुसऱ्या  तरुणाची पोलिसांनी ओळख पटवली असता तो कुख्यात गुन्हेगार दुर्गेश ऊर्फ छल्ला धु्रपसिंग चौधरी (वय २८) असल्याचे स्पष्ट झाले. छल्ला हा नागपुरातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याची शोधाशोध केली असता तो चोरीच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात बंद असल्याचे उघड झाले. त्यामुळे लकडगंज पोलिसांनी ९ आॅक्टोबरला त्याचा प्रॉडक्शन वॉरंट मिळवून कारागृहातून त्याला अटक केली. त्याचा कोर्टातून पीसीआर मिळवण्यात आला.

 नराधम छल्लाने  गुन्ह्याची कबुली दिली
बाचाबाची झाली अन् हत्या केली
घटनेच्या दिवशी अरमान त्या भागात किमती चिजवस्तू शोधण्यासाठी भटकत होता. त्यावेळी छल्ला त्या भागात दारू पीत बसून होता. अरमानला बघून त्याची विकृती जागी झाली. त्याने अरमानवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अरमानने विरोध करताच त्याच्या डोक्यात दगड घातला अन् नंतर त्याच्या देहाचे तुकडे केले. त्याने या गुन्ह्यासोबत अन्य दोन हत्येच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्यातील थरारक घटनाक्रम ऐकून काही वेळेसाठी पोलिसांनाही घाम सुटला. अशा प्रकारे मृताची ओळख नसताना अन् कोणताही पुरावा नसताना या हत्याकांडासोबतच अन्य दोन हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या बांधण्याची प्रशंसनीय कामगिरी पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक निकम, उपनिरीक्षक गाडेकर, राहाटे, रवि राठोड, हवालदार भोजराज बांते, अजय बैस, रमेश गोडे, दीपक कारोकार, लक्ष्मीकांत गावंडे, नायक प्रशांत चचाने, प्रदीप सोनटक्के, सुनील ठवकर आणि शिपाई सतीश ठाकूर यांनी बजावली.


एका आठवड्यात केली दोघांची हत्या
नराधम छल्लाने एप्रिलच्या दुसऱ्या  आठवड्यात कैलास पुनाराम नागपूरे (वय २८, रा. देशपांडे ले-आऊट, नंदनवन) याची रनाळा शिवारात (वडोदा गुमथळा कॅनल जवळ) हत्या केली होती. त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने तिकडे नेऊन लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. नागपुरे अर्धमेला झाल्यानंतर त्याला कोलकाता रेल्वेलाईनवर टाकले. तो जिवंतच होता. मात्र, काही वेळेतच रेल्वेगाडी आल्याने त्याच्या देहाचे तुकडे झाले. त्यावेळी पोलिसांनी रेल्वे अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह झाल्याची नवीन कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली.
या घटनेला एक आठवडा होत नाही तो पुन्हा त्याने आरिफ मुन्ने अन्सारी (वय १७, रा. कळमना) या युवकाचीही अशाच पद्धतीने हत्या केली. कळमना पोलिसांनी त्यावेळी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, तपासात फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे आरोपी बिनबोभाट गुन्हे करीत फिरला अन् निर्दोष अरमान त्याच्या हातून निर्घृणपणे मारला गेला.
 

 

Web Title: In Nagpur, after six months mysterious murderer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा