नागपूर ‘एम्स’; ‘एनएबीएच’ प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2023 10:16 PM2023-06-01T22:16:48+5:302023-06-01T22:17:15+5:30
Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर हे ‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’चे (एनएबीएच) मानाकंन प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे.
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर हे ‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’चे (एनएबीएच) मानाकंन प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. या कार्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेऊन ‘एम्स’ नागपूरच्या चमूचे अभिनंदन केले.
नागपूर ‘एम्स’ला २०१८ पासून सुरुवात झाली. सप्टेंबर २०१९ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) तर फेब्रुवारी २०२० पासून आकस्मिक विभागासह वॉर्ड रुग्णसेवेत सुरू झाले. या पाच वर्षांमध्ये ‘एम्स’मध्ये ३८ विभाग सुरू झाले. सध्या १८ वॉर्ड तर २३ सुसज्ज अशी शस्त्रक्रिया गृह आहेत. रोजची ओपीडीची संख्या वाढून अडीच हजारांवर गेली. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसोबतच नुकतेच बोनमॅरो ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण सुरू झाल्याने मध्य भारतातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आशेचे केंंद्र ठरले आहे. दरम्यानच्या काळात ‘एम्स’ प्रशासनाने रुग्णालयातील सेवांना घेऊन आवश्यक असलेल्या ‘एनएबीएच’साठी प्रयत्न केले. यात त्यांना यश येऊन हे मानांकन प्राप्त केले.
- ‘एनएबीएच’ची मान्यता प्रक्रिया कठोर
‘एनएबीएच’ ही भारतीय गुणवत्ता परिषदेचे एक घटक आहे. याची स्थापना आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता प्रदान करणे व संचालित करण्यासाठी झाली आहे. ‘एनएबीएच’ची मान्यता प्रक्रिया कठोर आणि सर्वसमावेशक असते. यामध्ये रुग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थात्मक कार्यक्षमतेसह अनेक क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. या सर्व मापदंडांमध्ये एम्स नागपूर खरे उतरले. आरोग्य क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
- आरोग्य सेवा पुरविण्याचा एक मापदंड स्थापित
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ‘एम्स’चे लोकार्पण डिसेंबर २०२२ मध्ये झाले होते. ‘एम्स’ नागपूरबाबतचे ट्विट करत प्रधानमंत्री मोदी यांनी रुग्णालयाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘‘ही कामगिरी दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याचा एक मापदंड स्थापित करणार आहे.’’