नागपूर एम्स देशात उत्तम रुग्णसेवेसाठी ओळखले जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:01+5:302021-09-27T04:10:01+5:30

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर, लवकरच सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण होऊन आपल्या उत्तम गुणवत्तेच्या आरोग्यसेवेसाठी हे संस्थान ...

Nagpur AIIMS will be known for the best patient care in the country | नागपूर एम्स देशात उत्तम रुग्णसेवेसाठी ओळखले जाणार

नागपूर एम्स देशात उत्तम रुग्णसेवेसाठी ओळखले जाणार

googlenewsNext

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर, लवकरच सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण होऊन आपल्या उत्तम गुणवत्तेच्या आरोग्यसेवेसाठी हे संस्थान देशातील वैद्यकीय संस्थांमध्ये अग्रस्थानी ओळखले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.

मिहानस्थित ‘एम्स’च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीसुद्धा आभासी माध्यमाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. एम्सच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमात खा. डॉ. विकास महात्मे, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. पी. के. दवे व एम्सच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता उपस्थित होत्या.

एम्सचा फायदा हा केवळ विदर्भातीलच नव्हे, तर शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगढमधील रुग्णांनासुद्धा होत आहे. कोविडच्या काळात एम्सचे डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांनी जीव धोक्यात घालून रुग्णसेवा दिली. एम्समध्ये नव्या अभ्यासक्रमासोबतच नेत्र, मूत्रपिंड, यकृत, हृदय व फुप्फुस आदी अवयवांच्या प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली. एम्स नागपूर सर्व स्तरावर रुग्णसेवेचे उच्चांक गाठत असल्याचे मत पालकमंत्री राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमात विविध विषयांमध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या ‘अभिज्ञान’ या पत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. डॉ. विभा दत्ता यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता डॉ. मृणाल फाटक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला एम्सचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

-आता ‘नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम’ - डॉ. पवार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी, एम्समधील सुविधांचा लाभ शहरासोबतच ग्रामीण भागात पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन’विषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, या अभियानामुळे व्यक्तिगत आरोग्य नोंदणी केली जाणार आहे. त्याचा फायदा ‘नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम’ची यंत्रणा तयार करण्यासाठी होणार आहे. २०१४ मध्ये देशात ६ ‘एम्स’ होते. आता देशात २२ एम्सचे बांधकाम चालू आहे.

Web Title: Nagpur AIIMS will be known for the best patient care in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.