नागपूरकरांचा हवाई प्रवास वाढला; वर्षभरात तीन लाखांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:24 AM2018-08-09T10:24:05+5:302018-08-09T10:24:28+5:30
उपराजधानीत वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे. वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये प्रवाशांची संख्या २१ लाख ७६ हजार ४३९ , तर वित्तीय वर्ष २०१६-१७ मध्ये ही संख्या १९ लाख ३८ हजार असल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) सूत्रांनी दिली.
दोन वर्षांत देशात विभिन्न शहरांसाठी उड्डाण आणि जोडणी वाढल्याचा फायदा नागपुरात एव्हिएशन क्षेत्राला झाला आहे. विमान कंपन्यांमध्ये वाढती स्पर्धा हे मुख्य कारण आहे. सध्या नागपुरात दिल्ली, मुंबई, इंदूर, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, पुणे, रायपूर, अलाहाबादसाठी उड्डाणे उपलब्ध आहेत.
भौगोलिकदृष्ट्या नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे विमानाने देशाच्या मोठ्या शहरांचे अंतर एक, दीड वा दोन तासांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे त्याचे शुल्क मेट्रो शहरांच्या तुलनेत कमी आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास दिल्ली-हैदराबाद विमानाचे अंतर १५४७ कि़मी. आहे. हे अंतर विमानाने दोन तासात गाठता येते. मुंबई-कोलकाता अंतर १३०५ कि़मी. असून ते गाठण्यासाठी दोन तास पाच मिनिटे लागतात. नागपूर-बेंगळुरू अंतर ९२५ कि़मी. असून १ तास ४० मिनिटात पोहोचता येते. नागपूर-कोलकाता अंतर ९६७ कि़मी. आहे. हे अंतर पार करण्यासाठी १ तास ४० मिनिटे तर नागपूर-दिल्लीच्या ८५२ कि़मी.करिता १ तास ३५ मिनिटे आणि नागपूर-हैदराबादच्या ४२३ कि़मी.करिता एक तास लागतो. रेल्वेमध्ये वेटिंग जास्त असल्यामुळे एसी सेकंड क्लासमध्ये प्रवास करण्यास सक्षम असलेले प्रवासी विमान आणि रेल्वे प्रवास शुल्कात कमी अंतर असल्यामुळे ते हवाई प्रवासाला प्राधान्य देत आहेत. नागपुरातून दिल्ली व मुंबईला जाणारे व्यावसायिक किमान एकवेळ हवाई मार्गाने प्रवास करीत आहेत.
स्वस्त व विशेष उड्डाणांनी प्रवास शक्य
नागपुरातील एअर इंडियाच्या एमआरओमुळे विमान कंपन्या नागपुरातून सेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत. एअर इंडियाचे दिल्ली, मुंबई वा अन्य शहरातून आॅपरेट होणारे विमान नागपुरात विमानांची देखरेख आणि दुरुस्तीसाठी येतात. दुरुस्तीनंतर डीजीसीएच्या मंजुरीनंतर व्यावसायिक विमानाच्या स्वरूपात उड्डाण भरते. अशा विमानांचे बुकिंग किफायत शुल्कासह काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात येते. अशा विमानाचे भाडे तीन हजारांपर्यंत असल्यामुळे प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या विशेष विमानांचा प्रचार व प्रसार करण्यात येतो.