आपातस्थितीत विमानांसाठी आधार बनले नागपूर विमानतळ; ११ महिन्यात १२ आपातकालीन लॅण्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 09:59 PM2021-11-29T21:59:44+5:302021-11-29T22:00:18+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे वाढविण्यााठी कुठलेही प्रयत्न करण्यात येत नाहीत, परंतु हे विमानतळ आपातस्थितीत उतरणाऱ्या विमानांसाठी आधार बनले आहे.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे वाढविण्यााठी कुठलेही प्रयत्न करण्यात येत नाहीत, परंतु हे विमानतळ आपातस्थितीत उतरणाऱ्या विमानांसाठी आधार बनले आहे. तांत्रिक अडचण आलेल्या विमानाला तातडीने उतरविण्यास प्राधान्य दिले जाते. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे अशा विमानांसाठी एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. यावर्षी १ जानेवारीपासून आतापर्यंत १२ विमानांचे आकस्मिक लॅण्डिंग झाल्याने हे विमानतळ किती महत्त्वपूर्ण आहे, यावरून त्याचा अंदाज लावता येऊ शकतो.
नागपूर विमानतळ सर्वच प्रवासी विमानांच्या लॅण्डिंगसाठी सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या रडारशी बहुतांश वैमानिक संपर्कात असतात. नागपूर विमानतळावर तीन आधुनिक क्रॅश फायर टेंडर आहेत. फायर फायटिंगच्या सुविधांमुळे नागपूर विमानतळ विमानानुसार आपली वर्गवारी बदलू शकतो. सामान्यत: डी-वर्गवारीत राहणारे विमानतळ कोणत्याही मोठ्या विमानाच्या लॅण्डिंगदरम्यान ई-वर्गवारीत येते. सध्या जास्तीत जास्त प्रवाशांना नवीन टर्मिनल बिल्डिंगमध्ये सामावून घेण्यासाठी करण्यात आलेल्या नवीनीकरणाने क्षमतेत काही प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष बाब अशी की, विमानतळ एमआरओपर्यंत टॅक्सी-वेने जुळला आहे. त्यामुळे मिहानमधील एमआरओमध्ये लहानापासून मोठ्या विमानांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येते.
आठ विमाने वळविण्यात आली
यावर्षी आतापर्यंत विमानतळावर आठ विमाने वळविण्यात आली आहेत. रायपूर, जबलपूर, हैदराबाद या शहरांमध्ये पावसाळ्यात विमानाच्या लॅण्डिंगदरम्यान अडचणी आल्यानंतर ती विमाने नागपूर विमानतळावर वळविण्यात आली आहे. या विमानतळावर हवेची दिशा विमानाच्या ये-जाकरिता अपेक्षाकृत जास्त अनुकूल आहे. नागपूरच्या हवामानाच्या विशेषतेमुळे नागपूर विमानतळ ‘ऑल टाईम वेदर एअरपोर्ट’च्या स्वरूपात ओळखले जाते.
उत्तम हवामान ही खासीयत
देशाच्या अन्य भागाच्या तुलनेत नागपूरचे हवामान अपेक्षेनुसार उत्तम असते. हिवाळ्यातही जास्त धुके पडत नाही. या भौगोलिक स्थितीमुळे आपातस्थितीत विमानाला नागपुरात उतरण्यास प्राधान्य दिले जाते. येथे मनपा, पोलीस व आरोग्य विभागाकडून तातडीने सुविधा मिळते. शिवाय विमानाच्या आपातकालीन लॅण्डिंगसाठी येथे सर्व संशाधने उपलब्ध आहेत.
आबीद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.